५१ लीटर विस्की, ५५ लीटर बियर घरात ठेवणाऱ्या कुटुंबाला दिल्ली कोर्टानं निर्दोष ठरवलं! जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:51 PM2022-03-04T12:51:48+5:302022-03-04T12:52:31+5:30
कायदेशीररित्या एका व्यक्तीला राहत्या घरात नेमकं किती प्रमाणात मद्य ठेवता येऊ शकतं यावर दिल्ली हायकोर्टानं महत्वाचा निकाल दिला आहे.
नवी दिल्ली-
कायदेशीररित्या एका व्यक्तीला राहत्या घरात नेमकं किती प्रमाणात मद्य ठेवता येऊ शकतं यावर दिल्ली हायकोर्टानं महत्वाचा निकाल दिला आहे. अबकारी नियमांनुसार २५ वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्तीला राहत्या घरात ९ लीटर विस्की, वोडका, जिन आणि रम तसंच १८ लीटर बियर, वाइन व एल्कोपॉप ठेवण्याची परवानगी आहे. कायद्यानुसार मान्यता असलेल्या मर्यादेपेक्षा अधिक मद्य घरात ठेवल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणी निकाल देताना कोर्टानं यावर टिप्पणी केली आहे.
आरोपीकडे सापडलेल्या मद्याच्या १३२ बाटल्या
न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांना आढळून आलं की याचिकाकर्त्याविरोधात दाखल असलेल्या एफआयआरनुसार त्याच्या घरातून मद्याच्या १३२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात ५१.८ लीटर विस्की, वोडका, जिन, रम आणि ५५.४ लीटर बियरचा समावेश होता. संबंधित व्यक्तीच्या एकत्र कुटुंबात २५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सहा सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी दिल्ली अबकारी कायदा, २००९ नुसार संबंधित कुटुंबाकडून कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही.
अवैध स्वरुपात मद्य ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी केली होती छापेमारी
कोर्टानं याचिकाकर्त्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित व्यक्तीकडून कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत नाही अशी नोंद कोर्टानं केली. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि अबकारी अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या टीपनुसार याचिकाकर्त्यांच्या घरावर छापेमारी केली होती. घराच्या बेसमेंट स्थित बार काऊंटरमध्ये कोणत्याही परवान्याविना देशी आणि विदेशी ब्रँडच्या मद्याच्या १३२ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.