पाठलाग करून वाहन पकडण्यास पोलिसांना उच्च न्यायालयाची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:24 AM2019-11-23T03:24:57+5:302019-11-23T06:18:21+5:30

वाहनचालक व पोलिसांच्या जीवाला धोका असल्याचे मत; वाहन थांबविण्याचा सिग्नल मिळताच चालकाने थांबले पाहिजे

High court forbids police from pursuing a vehicle | पाठलाग करून वाहन पकडण्यास पोलिसांना उच्च न्यायालयाची मनाई

पाठलाग करून वाहन पकडण्यास पोलिसांना उच्च न्यायालयाची मनाई

Next

- डॉ. खुशालचंद बाहेती 

नवी दिल्ली : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनासमोर अचानक येऊन, दुचाकीचे हॅण्डल पकडून किंवा पाठलाग करून वाहन थांबवण्यास पोलिसांना केरळ उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. यामुळे वाहनचालक व पोलीस दोघांचाही जीव धोक्यात येतो, याबद्दल चिंता व्यक्त करीत न्यायालयाने हा निर्णय दिला.

केरळ उच्च न्यायालयासमोर प्रकरण होते, एका दुचाकीचालकावर दाखल झालेल्या ३५३ भा.दं.वि.च्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनाचे १० ऑक्टोबर, २०१९ रोजी काही मोटारवाहन निरीक्षक महामार्गावर वाहन तपासणी करीत होते. त्यांना हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवणारा एक इसम येताना दिसला. त्याच्यामागे एक १६ वर्षांचा मुलगाही बसला होता. मोटार वाहन निरीक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला थांबण्याचा इशारा केला; पण त्याने वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहन निरीक्षक जखमी झाला व दुचाकीचालकही एका कारला धडकून जखमी झाला. दुचाकीचालकाच्या म्हणण्याप्रमाणे वाहन निरीक्षक अचानक समोर आले व तो पळून जाईल, असे समजून मोटारसायकलचे हॅण्डल पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तोल जाऊन तो कारवर धडकला. यात मोटारसायकलवरील दोघे व निरीक्षकही जखमी झाले. या घटनेबद्दल दुचाकीचालकावर ३५३ व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकपूर्व जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने ही घटना पोलीस व इतर अधिकारी वाहन थांबवण्यासाठी अचानक पकडण्याची जुनीच पद्धत अमलात आणत आहेत, हेच असल्याचे मत व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीत वाहतूक नियमभंगासाठी पोलीस किंवा इतर विभागाच्या लोकांनी अचानक समोर येऊन, पाठलाग करून पकडणे अपेक्षित नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. वाहन थांबवण्यासाठी कायद्यात असलेल्या तरतुदींचीही दखल घेतली. कायद्यात वाहन कसे थांबवावे याबद्दल असलेल्या तरतुदीत अचानक समोर येणे, हॅण्डल पकडणे, वाहनाची चावी काढून घेणे, पाठलाग करणे याचा समावेश नसल्याने या पद्धती बेकायदेशीर आहेत.

वाहतूक नियमभंगासाठी डिजिटल कॅमेरा, मोबाईल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेऱ्याचा वापर केला पाहिजे.
अशा प्रकारची तपासणी लोकांना पूर्वसूचना देऊन मोठी मोकळी जागा असणाऱ्या ठिकाणी केली पाहिजे.
तपासणीचा उद्देश लोकांना अचानक पकडून कारवाई करण्याऐवजी त्यांना सुरक्षेचे शिक्षण मिळावे हाही असला पाहिजे.
-न्या. राजा विजय राघवन व्ही., केरळ उच्च न्यायालय

काय आहे तरतूद?
वाहन थांबवण्याबद्दलची मोटार व्हेईकल ड्रायव्हिंग रेग्युलेशन्स २०१७ मधील तरतूद :
कोणतेही वाहन थांबवण्यासाठी गणवेशातील पोलीस अधिकारी किंवा इतर विभागांचे अधिकार प्राप्त अधिकाऱ्यांनी वाहनचालकास त्यांचे वाहनात असलेल्या टेक्निकल डिव्हाईस, लाल लाईट किंवा थांबण्याबद्दलची पाटी दाखवून वाहन थांबवण्याचा सिग्नल देऊन वाहन थांबले पाहिजे.

Web Title: High court forbids police from pursuing a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.