बुडणा-या तरुणीला हायकोर्ट जजने वाचविले
By admin | Published: April 7, 2015 03:51 AM2015-04-07T03:51:36+5:302015-04-07T03:51:36+5:30
येथील सुकना तलावात एक तरुणी बुडत असल्याचे दिसताच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी लगेच पाण्यात उडी मारून तिला वाचविल्याची घटना अलीकडेच घडली.
चंदीगड : येथील सुकना तलावात एक तरुणी बुडत असल्याचे दिसताच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी लगेच पाण्यात उडी मारून तिला वाचविल्याची घटना अलीकडेच घडली.
३० मार्च रोजी न्या. एम. जेयापॉल नेहमीप्रमाणे तलावाकाठी ‘मॉर्निंग वॉक’साठी गेले होते. काठावर एके ठिकाणी बरेच लोक जमून मदतीसाठी आरडाओरड करीत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता एक मुलगी पाण्यात बुडत असल्याचे त्यांना दिसले. न्या. जेयापॉल यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता लगेच पाण्यात उडी मारली. त्याच्या पाठोपाठ त्यांचा सुरक्षारक्षक यशपाल यानेही सूर मारला. दोघेही पोहत त्या मुलीजवळ गेले तोपर्यंत ती पाण्यात बुडाली होती. दोघांनी मिळून तिला काठावर आणले. नाकातोंडात पाणी गेल्याने शुद्ध हरपलेल्या त्या तरुणीला शुद्धीवर आणून तिची रवानगी इस्पितळात केली गेली.
नंतर असे उघड झाले की, त्या तरुणीला परीक्षेत चांगले गुण मिळाले होते; पण गरिबीमुळे वडिलांनी पुढे शिकविण्यास नकार दिल्याने तिने तलावात उडी मारली होती. हे कळल्यावर न्या. जेयापॉल यांनी त्या कुटुंबास तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली व आपल्या सुरक्षा रक्षकाचीही रोख बक्षीस व बढतीसाठी शिफारस केली. (वृत्तसंस्था)