उच्चशिक्षित विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर, पीएचडी करणारा 'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:09 AM2018-01-08T10:09:46+5:302018-01-08T10:10:26+5:30
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रीनगर- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हा तरूण आहे. ५ जानेवारी रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मन्नानचा हातात ग्रेनेड लाँचर घेतलेला एक फोटो कुपवाड्यात व्हायरल झाला आहे. व्हॉट्स अॅप व फेसबुकवर हा फोटो अपलोड करण्यात आला असून त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याचं या फोटोमध्ये म्हटलं आहे. बशीर अहमद वानी असं मन्नानच्या वडिलांचं नाव असून ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात राहतात. मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमद हासुद्धा इंजिनिअर आहे.
‘मन्नानचा फोटो आम्ही पाहिला. गेल्या चार दिवसांपासून त्याच्याशी आमचा संपर्क झालेला नाही. 4 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोनही बंद होता. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे मन्नान हरविल्याची तक्रार दाखल केली होती’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं.
दरम्यान, अलीगड विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार मन्नान वाणी हा 'स्ट्रक्चरल अॅण्ड जिओ-मोरफोलॉजिकल स्टुडी ऑफ लोबल व्हॅली, काश्मीर' या विषयावर पीएचडी करत होता. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. मन्नानला 2016 मध्ये ‘जल, पर्यावरण आणि समाज’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम रिसर्च पेपर सादर केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्याने काश्मीर विद्यापीठातून भूगर्भ शास्त्रात पदवी घेतली होती. यानंतर त्याने पदव्यूत्तर शिक्षण अलीगड विद्यापीठातून घेतलं.
‘महिनाभरापूर्वीच माझा भाऊ अलीगडला जाण्यासाठी घरातून निघाला. तो अलीगडलाच असेल असं आम्हाला वाटत होतं. तो रोज आमच्याशी फोनवर बोलत होता. तो या मार्गाला कसा गेला हेच आम्हाला कळत नाही’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून मन्नान विद्यापीठातील राजकारणात सक्रीय होता. विद्यापीठातील निवडणुकांमध्येही त्याने सहभाग घेतला होता. विद्यार्थी संघटनांमधील राजकारणावर त्याने काही लेख लिहीले आहेत.