तिहार तुरूंगात छोटा राजनला विशेष सुविधा; कैद्यांकडून तुरुंग प्रशासनाविरोधात उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 05:44 PM2018-03-21T17:44:02+5:302018-03-21T17:47:25+5:30
काही महिन्यांपूर्वी याच नीरज बवानाकरवी छोटा राजनला तिहारच्या तुरूंगातच संपवण्याचा कट उघडकीला आला होता.
नवी दिल्ली: कुख्यात गुंड छोटा राजन याला तिहार तुरुंगात देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर तेथील कैद्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या तुरुंग प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राजनला पुरविण्यात येणाऱ्या विशेष सुविधांना विरोध करत मोहम्मद शहाबुद्दीन आणि नीरज बवाना या दोन कैद्यांनी उपोषणही सुरू केले आहे. तुरुंग प्रशासन राजनला इतर कैद्यांच्या तुलनेत झुकते माप देत असल्याचे या दोघांचे म्हणणे आहे.
काही महिन्यांपूर्वी याच नीरज बवानाकरवी छोटा राजनला तिहारच्या तुरूंगातच संपवण्याचा कट उघडकीला आला होता. त्यानंतर आता बवानाने थेट न्यायालयाला पत्र लिहून छोटा राजनला विशेष सुविधा पुरविण्यात येत असल्याची तक्रार केली. तिहार तुरुंगातील कैद्यांना चांगेल भोजन आणि औषधं उपलब्ध करून दिली जात नाहीत, असे बवानाने पत्रात म्हटले आहे. याविरोधात बवाना सध्या तुरुंगातच उपोषणाला बसला आहे.
याशिवाय, खुनाच्या खटल्यात तुरूंगात असलेला राजदचा माजी खासदार शहाबुद्दीन हादेखील बवानाच्या जोडीला तुरूंगात बसला आहे. त्यानेही छोटा राजनला तुरुंग प्रशासनाकडून विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्यासह अन्य कैद्यांना ज्या बराकींमध्ये ठेवण्यात आले आहे, तिथे मोठ्याप्रमाणावर डास आणि अन्य कीटक आहेत. तसेच बराकींच्या भिंतीची वाळू जमिनीवर पडत आहे. कैद्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले जात नाही, तसेच त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, अशा अनेक तक्रारी शहाबुद्दीन याने न्यायालयाकडे केल्या आहेत.