हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:01 PM2024-05-14T13:01:57+5:302024-05-14T13:08:24+5:30
Crime News: विमानांमध्ये मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करणऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील दागदागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका हायप्रोफाईल चोराला दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या चोराचं नाव राजेश कपूर असं असून, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ विमानामधून प्रवास करतानाच चोऱ्या करायचा.
विमानांमध्ये मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करणऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील दागदागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका हायप्रोफाईल चोराला दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या चोराचं नाव राजेश कपूर असं असून, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ विमानामधून प्रवास करतानाच चोऱ्या करायचा. तो विमानातून प्रवास करत असताना प्रवाशांच्या हँडबॅगमधील दागिने आणि इतर मौल्यवान सामानावर डल्ला मारायचा. पोलिसांनी पहाडगंज परिसरातून आरोपी राजेश कपूरला अटक केली आहे.
या हायप्रोफाईल चोराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेश कपूरने चोरी करण्यासाठी मागच्या वर्षभरात तब्बल २०० हून अधिक वेळा विमान प्रवास केला. तसेच यादरम्यान, तो ११० दिवसांहून अधिक काळ केवळ विमानामध्येच राहिला. राजेश कपूर याला पहाडगंज येथून अटक करण्यात आली असून, त्याने तिथेच चोरीचे दागिने आणि इतर मुद्देमाल लपवून ठेवला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त (आयजीआय) उषा रंगनानी यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की, आरोप हा ऐवज शरद जैन यांना विकण्याच्या तयारीत होता. त्यालाही करोल बाग येथून अटक करण्यात आली आहे. रंगनानी यांनी सांगितले की, मागच्या तीन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विमानांमधून चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी आयजीआय विमानतळावर एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं.
पोलिसांनी सांगितलं की, कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने हैदराबादमधील पाच विमान प्रवासादरम्यान झालेल्या चोरींमध्ये आपला हात असल्याचे मान्य केले. तसेच बहुतांश रक्कम ऑनलाईन आणि ऑफलाईन जुगारामध्ये खर्च केल्याचे त्याने मान्य केले. त्याशिवाय राजेश कपूर हा चोरी, गुगार आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांच्या ११ घटनांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी राजेश कपूर हा आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान वृद्ध महिलांना लक्ष्य करायचा, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, हँडबॅगमधून मौल्यवान वस्तू नेणाऱ्या प्रवाशांवर आरोपी पाळत ठेवायचा. तसेच असे प्रवासी प्रवासाला प्राधान्य देतात अशा देशांतर्गत प्रीमियम विमान उड्डाणे विशेषकरून एअर इंडिया आणि विस्तारा अशा विमानांमधून तो प्रवास करायचा. बोर्डिंगमधील दुरावस्थेचा फायदा घेऊन आरोपी ओव्हरहेड केबिनमध्ये ठेवलेल्या हँडबॅगची हुशारीने चाचपणी करून त्यामधील सामान चोरायचा.