कॅशलेस पद्धतीने पोलिसच चालवत होता हाय-टेक सेक्स रॅकेट
By admin | Published: April 24, 2017 09:16 PM2017-04-24T21:16:34+5:302017-04-24T21:16:34+5:30
कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यावर काय होईल? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 24 - बंगळुरुतील एक पोलीस हेड कॉन्स्टेबलला सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यावर काय होईल? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत. अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव करीबसप्पा असे आहे. हा हेड कॉन्स्टेबल ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवत होता. यात त्याने कॅशलेस व्यवहार करण्याची स्मार्ट पद्धतही अवलंबली होती. अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात एका मिको लेआऊटमधील घरावर छापा टाकत पोलिसांनी हे हाय-टेक रॅकेट उध्वस्त केले. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली. शिवाय स्वाइप मशीन आणि मोठी रोकडही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
करीबसप्पा हा परप्पन अग्रहरा पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होता. हाय-टेक सेक्स रॅकेटच्या या व्यवसायात तो इतर दोन दलालांकडून नफ्याचा हिस्सा मिळवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोन दलाल कोण आहेत, याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.
करीबसप्पाला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.