तेलंगणात हायव्होल्टेज ड्रामा! मोदींच्या सभेपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्षांना अटक, दोन आमदार ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:09 PM2023-04-05T13:09:12+5:302023-04-05T13:09:50+5:30
बंदी संजय यांना का ताब्यात घेण्यात आले आहे, याची माहिती पोलीस देत नसल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. संजय यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
तेलंगणाचेभाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांना पोलिसांनी मध्यरात्री अचानक ताब्यात घेतले आहे. यामुळे तिथे राजकीय वातावरण तणावाचे बनले असून पोलीस बंदी संजय यांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठविण्याची तयारी करत आहेत. पोलीस ठाण्यासमोर भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. बंदी संजय यांना अटक करण्यात आली असून भाजपाच्या दोन आमदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तेलंगणापोलिसांनी बुधवारी भाजप आमदार रघुनंदन राव आणि एटाळा राजेंद्र आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिस आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना मध्यरात्रीच पोलिसांनी अटक केल्याचे समजताच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचे हैदराबादमधील प्रमुख नेते रामचंदर राव यांच्याशी चर्चा करत कारण विचारले आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी देखील तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार यांना फोन करून चर्चा केली आहे. यानंतर संसद परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नड्डा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.
तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांना यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील बोम्माला रामाराम पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस बंगारू श्रुती यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांच्या ताब्यात घेण्याबाबत उच्च न्यायालयात कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची लेखी ादेश देणारी याचिका दाखल केली आहे.
बंदी संजय यांना का ताब्यात घेण्यात आले आहे, याची माहिती पोलीस देत नसल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. संजय यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. मोदींचा या राज्यात दौरा आहे, त्यापूर्वीच संजय यांना ताब्यात घेण्यात आल्याने भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.
प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आम्ही केसीआर सरकारविरोधात आवाज उठवत आहोत, हे या कारवाईमागचे कारण आहे. हे सर्व 'लोकशाही' विरोधात आहे,' असा आरोप रेड्डी यांनी केला आहे.