अयोध्येत मशिदीसाठी हिंदूंच्या सर्वाधिक देणग्या! अद्याप काम का सुरू नाही? जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 06:51 AM2022-11-12T06:51:52+5:302022-11-12T06:52:21+5:30
सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या निकालाद्वारे अयोध्या येथील रामजन्मभूमीची जमीन राममंदिर बांधण्यासाठी दिली
अयोध्या :
सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या निकालाद्वारे अयोध्या येथील रामजन्मभूमीची जमीन राममंदिर बांधण्यासाठी दिली; तसेच या शहरात पाच एकर जमीन मशीद बांधण्याकरिता सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला प्रदान करण्यात आली होती. ही मशीद बांधण्यासाठी मिळालेल्या देणग्यांपैकी ४० टक्के रक्कम हिंदूंनी दिली आहे.
या जमिनीचे बिगरशेत जमिनीमध्ये रूपांतर करण्यासाठी तसेच तिथे सातमजली मशिदीचे बांधकाम करण्याकरिता अयोध्या
विकास प्राधिकरणाकडे अर्ज दिला आहे.
अद्याप काम का सुरू नाही?
- ज्या जागी मशीद उभी राहाणार आहे, तिथे जाण्यासाठी असलेल्या दोन रस्त्यांची रुंदी प्रत्येकी ४.१० मीटर आहे. हे रस्ते प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे करावेत, असा अर्ज मशिदीच्या ट्रस्टने दिला आहे.
- मात्र त्या संदर्भातील नकाशा अजून अयोध्या विकास प्राधिकरणाने मंजूर केलेला नाही. अरुंद रस्त्यांमुळे मशीद बांधण्याचे कामच सुरू होऊ शकलेले नाही.
देणगीदारांमध्ये मुस्लिमांचा सहभाग ३० टक्के
अयोध्येमध्ये पाच एकर जमिनीवर मशीद बांधण्यासाठी आजवर ४० लाख रुपयांच्या देणग्या संबंधित ट्रस्टला मिळाल्या आहेत. त्यांतील ४० टक्के रक्कम हिंदूंनी, ३० टक्के रक्कम कॉर्पोरेट कंपन्या, ३० टक्के पैसे मुस्लिमांनी दिले आहेत.
मशीद बांधण्यासाठी हिंदूंनी सर्वाधिक देणग्या देणे हे धार्मिक बंधुभावाचे उदाहरण असल्याचे मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वांत पहिली देणगी लखनौ विद्यापीठातील विधि शाखेचे सदस्य रोहित श्रीवास्तव यांनी दिली होती.