वायुप्रदूषणामुळे दरवर्षी सर्वाधिक बळी महाराष्ट्रात; मुंबई देशात सर्वाधिक प्रदूषित शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:49 AM2019-02-13T05:49:29+5:302019-02-13T05:50:33+5:30
वायुप्रदूषणामुळे देशात सर्वाधिक १ लाख ८ हजार अपमृत्यू महाराष्ट्रात झाले असून, देशाची आर्थिक राजधानी मुंबर्ई देशातील सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पुढे येत आहे. देशात दरवर्षी २४ लाख मृत्यू वायुप्रदूषणामुळे होतात.
- राजू नायक
निमली (राजस्थान) : वायुप्रदूषणामुळे देशात सर्वाधिक १ लाख ८ हजार अपमृत्यू महाराष्ट्रात झाले असून, देशाची आर्थिक राजधानी मुंबर्ई देशातील सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पुढे येत आहे. देशात दरवर्षी २४ लाख मृत्यू वायुप्रदूषणामुळे होतात.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवर आधारित ‘भारतातील पर्यावरणाची सद्य:स्थिती-२०१९’ हा अहवाल मंगळवारी विज्ञान आणि पर्यावरण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला. त्यात महाराष्ट्राने लक्षवेधी प्रदूषणाची पातळी गाठल्याचे म्हटले आहे. महाराष्टÑातील वाढत्या प्रदूषणावर ‘राज्यातील शहरांचा श्वास गुदमरतोय’ असे वृत्त ‘लोकमत’ने २२ जानेवारी रोजी दिले आहे. या वृत्तावर पर्यावरणविषयक अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.
हा अहवाल लवकरच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. पुणेस्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र केंद्राचे संचालक डॉ. गुलफ्रान बेग यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्लीत जरी धुळीचे प्रमाण जादा असले तरी मुंबईत बांधकामावरच्या धूलिकणांसह, वाहनांतून निघणारा धूर, औद्योगिक प्रदूषणातून उद्भवणारे विषारी रासायनिक कण अधिक आहेत. शिवाय, आर्द्रतेमुळे
हे विषारी धूलिकण हवेतच तरंगत राहतात.
मुंबईबाबत सर्वांत धोकादायक माहिती अशी की, अत्यंत विषारी असलेल्या नायट्रोजन डायआॅक्साइडचे प्रमाण २००७ ते २०१७ या दहा वर्षांत १० टक्क्यांनी वाढले आहे. यातही डोंबिवली, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहरे दिल्ली आणि हावडा यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहेत. नवी मुंबई, ठाणे या महाराष्ट्रातील शहरांनी कानपूर, कोलकाता आणि मिरत यांच्याबरोबर स्थान मिळविले आहे.
दिल्ली शहर जरी जादा प्रदूषणाने ग्रासले असले तरी तेथल्या प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १२,३२२ इतकीच आहे. दिल्लीस्थित विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने या कमी प्रमाणाचे श्रेय न्यायालयीन हस्तक्षेपाला दिले आहे. विस्तारलेल्या आरोग्य सुविधा, नियंत्रणाखाली आलेली वाहतूक व्यवस्था, वाहतुकीवरील निर्बंध आणि वाहनांसाठी नैसर्गिक वायू वापरण्याची सक्ती यामुळे मृत्यूंचे प्रमाण घटले आहे. मात्र, संपूर्ण देशात वायुप्रदूषणामुळे १.२४ दशलक्ष मृत्यूंची नोंद झालेली असून अस्थमा व अन्य श्वसनविषयक रोग, फुप्फुसांचा कर्करोग, हृदयविकार अशा आजारांत या प्रदूषणाची फलनिष्पत्ती होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
प्रदूषण वाढण्यामागची कारणे
वाहनांच्या संख्येत झालेली अनियंत्रित वाढ, वाढते औद्योगिकीकरण तसेच शहरीकरणाचा विस्तार पेलण्यासाठी केले जाणारे अनिर्बंध बांधकाम.
वायुप्रदूषणाचे स्रोत : वाहनांंचे उत्सर्जन, प्रक्रिया न केलेले औद्योगिक उत्सर्जन, कचऱ्याच्या ढिगाºयांना आग लावल्यामळे होणारे प्रदूषण.
दिल्लीमधील वातावरणातील प्रदूषणाचे मोजमाप काढणारी यंत्रणा मुंबई आणि कोलकाताच्या तुलनेत प्रभावी आहे. मुंबईच्या अफाट पसाºयात तर अशा प्रकारची देखरेख ठेवणारी केवळ तीन स्टेशन्स आहेत.
वायुप्रदूषणामुळे होणारे
राज्यनिहाय अपमृत्यू
महाराष्टÑ १०८०३८
तमिळनाडू ६१२०५
केरळ २८०५१
पंजाब २६५९४
दिल्ली १२३२२
उत्तराखंड १२०००