ईशान्य भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सर्वाधिक
By admin | Published: May 15, 2016 04:22 AM2016-05-15T04:22:18+5:302016-05-15T04:22:18+5:30
भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.
नवी दिल्ली : भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. जाती व धर्माच्या अभिमानापायी कित्येक पालकांनी आपल्या पोटच्या मुलाची वा मुलीचीच हत्या केल्याच्या आॅनर किलींगच्या घटनाही प्रसिद्ध होत असतात. पण आपल्याच देशात असे एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त म्हणजे ५५ टक्के आंतराजातीय विवाह होतात. ते राज्य आहे मिझोरम.
अलीकडेच प्रदिर्शत झालेला सैराट चित्रपट खूप गाजत असून, त्यातील आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरूनही घराघरांत आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ईशान्यकडील राज्यांमध्ये आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण अधिक आहे. अगदी जम्मू-काश्मीरमध्येही अशा विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे.
इंडियन ह्युमन डेव्हलपमेंटने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ३३ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश होता. नॅशनल कौन्सिल आॅफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारतात फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात. भारतासारख्या बहुधर्मीय व हजारो जाती असलेल्या देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> मिझोरममील बहुसंख्य नागरिक ख्रिश्चनधर्मीय असून तिथे तब्बल ५५ टक्के तरुण-तरुणी आंतरजातीय विवाह करतात. या क्र मवारीत दुसऱ्या क्र मांकावर आहे मेघालय हे राज्य. तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आहे ४६ टक्के आहे आणि सिक्कीम तिसऱ्या स्थानावर असून, तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण ३८ टक्के आहे. मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीर राज्य चौथ्या क्रमांकावर असून, तिथे ३५ टक्के विवाह आंतरजातीय होतात. गुजरात पाचव्या स्थानावर आहे. तिथे आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.