बंगळुरूत 127 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 10:59 AM2017-08-16T10:59:43+5:302017-08-16T11:04:03+5:30
बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.
बंगळुरू, दि. 16- बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं. बंगळुरू शहरात सोमवारी रात्री 44.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर मंगळवारी सकाळी ही पावसाची नोंद वाढलेली पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी बंगळुरू शहरात 128.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 1890 नंतर 2017 च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधीक पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी रात्री अकरा ते बुधवारी सकाळी 4 वाजेपर्यंत पावसाने हा उच्चांक गाठला आहे. एकंदरीतच बंगळुरूमध्ये 127 वर्षांनंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
याआधी 27 ऑगस्ट 1890मध्ये बंगळुरूत सर्वात जास्त पाऊस पडला होता. त्यावेळी 162.1 मिमी पावसाची नोंद झाली होती. कर्नाटक राज्य आपत्ती देखरेख कक्षाच्या माहितीनुसार 1890नंतर आता 2017मध्ये इतक्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटक राज्य आपत्ती देखरेख कक्षाच्या माहितीनुसार सोमवारी रात्रीपासून 184 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आणखी वाचा
राज्यात 3 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज
महापुरामुळे बिहारमध्ये आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू
सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा शहराच्या विविध भागांमध्ये तडाखा बसला. शहरामधील सखल भागात ठिकठिकाणी पाणी जमल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी रात्री सुरू झालेला हा पाऊस मंगळवारी सकाळीसुद्धा तितकाच बरसत होता. त्यामुळे शहरातील जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला. शहरात असणाऱ्या यदियार तलावातून संरक्षण भिंत ओलांडून पाणी वाहत होतं. तर बेलंदूर तलावातील पाणी आसपासच्या परिसरात शिरलं होतं. कोरामंगल भागातील सखल भागात पाणी साचल्याने तेथे बचावासाठी 40 बचाव बोटी उतरल्या होत्या. तसंच जयानगर, कोरामंगल आणि बॅनरघट्टा रोडवर तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी अग्मिशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. तसंच राजराजेश्वरी नगर, जेपी नगर, नगरभवी, थानिसंद्रा, उत्तराहल्ली आणि पुत्तनाहल्ली या भागात असलेल्या घरांमध्ये साप शिरल्याच्या तक्रारी करणारे फोन वन्यजीवन स्वयंसेवकांना करण्यात आले होते.
मंगळवारी स्वातंत्र्य दिन असल्याने शाळा आणि ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे बंगळुरूमधील लोकांना घराबाहेर पडावं न लागल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. पण सोमवारी रात्रपाळीसाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी घरी परतत असताना या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला.