सिंहांच्या कळपासाठी महामार्ग थबकला!
By admin | Published: April 17, 2017 01:47 AM2017-04-17T01:47:08+5:302017-04-17T01:47:08+5:30
सुमारे १२ सिंहांच्या एका कळपाला सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी गुजरातमधील पिपापाव-राजुला महामार्गावरील वाहतूक शनिवारी रात्री सुमारे २० मिनिटे थबकली होती.
अहमदाबाद : सुमारे १२ सिंहांच्या एका कळपाला सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी गुजरातमधील पिपापाव-राजुला महामार्गावरील वाहतूक शनिवारी रात्री सुमारे २० मिनिटे थबकली होती.
या कळपात सिंह, सिंहिणी व लहान पिल्ले अशी मिळून दोन-तीन कुटुंबे असावीत. माणसांच्या सान्निध्याने आणि वाहनांच्या प्रकाशझोताने जराही न बुजता शांतपणे रस्ता ओलांडणाऱ्या या सिंहाची छायाचित्रे थांबलेल्या वाहनांमधील लोकांनी काढून समाजमाध्यमांवर टाकली. ती पाहून निसर्गप्रमींची मने सुखावली.
हे सिंह अगदी सराईतपणे आणि निवांतपणे रस्ता ओलांडताना पाहायला मिळाले. एक मोठा सिंह या कळपाचे नेतृत्व करीत होता. सुरुवातीस या सिंहानी महामार्गाचा एका बाजूचा रस्ता पार केला. दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरु होती. त्यामुळे हे सिंह वाहतूक थांबण्याची प्रतिक्षा करत दुभाजकापशी थांबून राहिले. दुसऱ्या बाजूची वाहतूकही थांबल्यावर तोही रस्ता ओलांडून हे सिंह शांतपणे पलिकडे गेले.