Hijab Controversy: 'एक दिवस 'हिजाबी' देशाची पंतप्रधान बनेल', हिजाब वादावर ओवेसींचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:13 AM2022-02-13T11:13:47+5:302022-02-13T11:13:55+5:30
'मुलींना हिजाब घालायचा असेल, तर त्यांना कुणी अडवू शकत नाही.'
नवी दिल्ली:कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटत आहेत. अनेक सत्ताधारी आणि विरोधी नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही याच हिजाब वादावर मोठे वक्तव्य केले आहे. 'इंशा अल्लाह, एक दिवस हिजाबी पंतप्रधान बनेल,'असे ट्विट ओवेसी यांनी केले आहे.
व्हिडिओमध्ये ओवेसी म्हणतात की, 'आमच्या मुलींना शुभेच्छा देतो. मुलींना हिजाब घालायचा असेल, तर त्यांना कुणी अडवू शकत नाही. आम्ही पाहतो त्यांना कोण अडवतं. हिजाब, नकाब घालणार आणि कॉलेजमध्येही जाणार. हिजाब घालून कलेक्टर बनणार, बिजनेस वूमन, एसडीएम आणि एक दिवस हिजाब घालणारी तरुणीच या देशाची पंतप्रधानदेखील बनेल.'
इंशा’अल्लाह pic.twitter.com/lqtDnReXBm
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 12, 2022
'हिजाबचा अधिकार संविधानाने दिला आहे'
यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब वादात पुट्टास्वामींच्या निकालाचा संदर्भ दिला होता. ओवेसी म्हणाले होते, 'भारतीय राज्यघटनेने हिजाब, निकाब घालण्याचा अधिकार दिला आहे. पुट्टास्वामींचा निकाल तुम्हाला हे करण्याची परवानगी देतो. ही आपली ओळख आहे. कोणतीही मुस्लिम महिला कोणत्याही भीतीशिवाय हिजाब घालू शकते. हिंदूंसमोर घोषणा देणाऱ्या त्या मुलीला मी सलाम करतो.'
काय आहे प्रकरण?
या महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात हिजाब घालून जाणाऱ्या काही विद्यार्थिनींना प्रशासनाने रोखले होते. यानंतर हिजाब विरुद्ध भगवा गमछा वाद सुरू झाला आणि राज्यभर पसरला. त्यानंतर हिंदू विद्यार्थ्यांसमोर अल्ला हु अकबरचा नारा देणाऱ्या मुलीचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर वाद देशभरात पेटला.