हिजाब, हलाल, अजान अन् आता दुकान...; कर्नाटकपासून महाराष्ट्र-दिल्लीपर्यंत राजकारण पेटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 01:17 PM2022-04-06T13:17:35+5:302022-04-06T13:19:20+5:30
आधी हिजाब, नंतर हलाल, मग अजान आणि आता दुकान... देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम, असे राजकारण पुन्हा एकदा जोर धरताना ...
आधी हिजाब, नंतर हलाल, मग अजान आणि आता दुकान... देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम, असे राजकारण पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. कर्नाटकात हिजाबवरून सुरू झालेले राजकारणदिल्लीत दुकान बंद करण्याच्या मुद्द्यापर्यंत पोहोचले आहे. कर्नाटकातील हिंदू संघटनांनी हलाल मांस खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. याचबरोबर दिल्लीतील मांसाची दुकाने नवरात्रीच्या काळात बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
'नवरात्रीच्या काळात बंद ठेवण्यात यावीत मांसाची दुकानं'
नवरात्रीच्या काळात राजधानी दिल्लीमध्ये मांसाची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, असे भाजप म्हणत आहे. एवढेच नाही, तर दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीच्या महापौरांनी नवरात्रीच्या काळात मांसाची दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी आयुक्त ज्ञानेश भारती यांना पत्र लिहून नवरात्रीच्या काळात मांसाची दुकाने उघडण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे.
मुकेश सूर्यन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, नवरात्रीच्या काळात दुर्गापूजेसाठी जाणाऱ्या भाविकांना मांसाच्या दुकानातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होतो. यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्यामुळे 11 एप्रिलपर्यंत मांसाची दुकाने बंद ठेवण्यात यावीत.
याशिवाय, पूर्व दिल्लीचे महापौर श्याम सुंदर अग्रवाल यांनीही मांसाचे दुकान बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रीच्या काळात मांसविक्रीची दुकाने बंद ठेवायला हवीत, यामुळे आम्हाला आनंद होईल, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, वाद वाढल्यानंतर, आपण केवळ आवाहन केले आहे, असे अग्रवाल म्हणाले.
यावर बोलताना, मांसाचे दुकान बंद ठेवल्याने होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोण करणार? असा प्रश्न हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. तसेच, केवळ 99% नाही तर 100% लोकांकडे मांस खरेदी करायचे, की नाही, हा पर्याय खुला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.