नौदलाला पाहताच अपहरणकर्ते पळाले, आयएनएस चेन्नईची मोहीम फत्ते; १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह २१ जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:18 AM2024-01-06T08:18:36+5:302024-01-06T08:19:12+5:30

भारतीय नौदलाच्या सागरी ‘मार्कोस’ कमांडोंनी थेट जहाजावर उतरत जहाजावरील १५ भारतीय कर्मचारी सदस्यांसह २१ जणांची सुटका केली.

Hijackers flee on sight of navy, INS Chennai mission foiled; 21 people including 15 Indian workers were rescued | नौदलाला पाहताच अपहरणकर्ते पळाले, आयएनएस चेन्नईची मोहीम फत्ते; १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह २१ जणांची सुटका

नौदलाला पाहताच अपहरणकर्ते पळाले, आयएनएस चेन्नईची मोहीम फत्ते; १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह २१ जणांची सुटका

नवी दिल्ली : अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ शुक्रवारी अपहरण झालेल्या जहाजावरील भारतीय नौदलाचे ऑपरेशन पूर्ण झाले आहे. भारतीय नौदलाच्या सागरी ‘मार्कोस’ कमांडोंनी थेट जहाजावर उतरत जहाजावरील १५ भारतीय कर्मचारी सदस्यांसह २१ जणांची सुटका केली. भारतीय नौदलाला पाहताच अपहरणकतर्ते पळून गेले, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एमव्ही लिला नॉरफोक’या व्यावसायिक जहाजाच्या अपहरणाला प्रत्युत्तर म्हणून नौदलाने एक युद्धनौका, सागरी गस्ती विमान ‘पी-८ आय’ आणि लांब पल्ल्याचे प्रीडेटर एमक्यू ९ बी ड्रोन तैनात केले होते. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आघाडीची युद्धनौका आयएनएस चेन्नईला तिच्या चाचेगिरी विरोधी गस्तीपासून वळवण्यात आले आणि तिने उत्तर अरबी समुद्रात दुपारी ३:१५ वाजता अपहृत जहाज अडवले. मोहिमेवर तैनात केलेल्या युद्धनौकेवर उपस्थित भारतीय नौदलाचे सागरी कमांडो व्यापारी जहाजावर चढले आणि त्यांनी ताबा मिळवण्याची पुढील कारवाई केली.

चिंता वाढली
गुरुवारी संध्याकाळी पाच ते सहा अज्ञात सशस्त्र चाचे जहाजावर चढले आणि त्यांनी जहाजाचा ताबा मिळवला, असा संदेश एमव्ही लिला नॉरफोक जहाजाने ब्रिटनच्या समुद्री व्यापार प्रक्रिया (यूकेएमटीओ) पोर्टलवर पाठविला होता. त्यानंतर समन्वयातून भारतीय नौदलाने कारवाई केली. इस्रायल-हमास संघर्षादरम्यान लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हौती अतिरेक्यांनी हल्ले वाढवल्याबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अपहरणाची घटना घडली आहे.

नौदल म्हणते...
- जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीयत्वाबाबत नौदलाकडून कोणतीही स्पष्टता नसली तरी त्यापैकी १५ भारतीय असल्याचे कळते.
- भारतीय नौदल आंतरराष्ट्रीय भागीदार आणि मैत्रीपूर्ण परदेशी देशांसह या प्रदेशातील व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे नौदलाने म्हटले आहे.

आधीच्या काही घटना..
- २१भारतीय कर्मचारी सदस्यांसह लायबेरियन ध्वजांकित जहाज एमव्ही केम प्लूटो हे २३ डिसेंबर रोजी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य झाले होते.
- त्याच दिवशी भारताकडे जाणारे आणखी एक व्यावसायिक तेल टँकरवर दक्षिणी लाल समुद्रात संशयास्पद ड्रोन हल्ला झाला होता. त्या जहाजात २५ भारतीय कर्मचारी होते. 
- माल्टा ध्वजांकित जहाज एमव्ही रुएनचे १४ डिसेंबर रोजी समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते.

Web Title: Hijackers flee on sight of navy, INS Chennai mission foiled; 21 people including 15 Indian workers were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.