अरबी समुद्रात मालवाहू जहाजाचे अपहरण, भारतीय नौदल सर्वात आधी मदतीला धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 03:48 PM2023-12-16T15:48:43+5:302023-12-16T15:49:20+5:30
भारतीय नौदलाचे जहाज अपहरण झालेल्या जहाजापर्यंत पोहोचले असून त्या जहाजावर बारीक लक्ष ठेवून आहे.
नवी दिल्ली : अरबी समुद्रात चाचेगिरी रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या भारतीय नौदलाने अरबी समुद्रात माल्टा-ध्वज असलेल्या एमव्ही रुएन (MV Ruen) या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. १८ कर्मचारी असलेल्या जहाजाचे सहा जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतचा तातडीचा मेसेज मिळताच भारतीय नौदलाची विमाने आणि युद्धनौका समुद्री चाच्यांच्या तावडीत अडकलेल्या जहाजाच्या दिशेने पुढे सरकू लागल्या. भारतीय नौदलाचे जहाज अपहरण झालेल्या जहाजापर्यंत पोहोचले असून त्या जहाजावर बारीक लक्ष ठेवून आहे.
भारतीय नौदलाला अरबी समुद्रात अपहरण झालेल्या जहाजाचे ठिकाण सापडले आहे. अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या जहाजावर सोमालियातील (Somalia)समुद्री चाच्यांनी हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. हे जहाज सध्या सोमालियाच्या किनार्याकडे सरकत आहे. तसेच, अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेल्या जहाजावर विमानातून नजर ठेवली जात आहे. परिसरातील इतर एजन्सी/एमएनएफ यांच्या सहकार्याने संपूर्ण परिस्थितीचे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
याबाबत भारतीय नौदलाने सांगितले की, नौदलाने अदनच्या खाडीत चाचेगिरीवर पाळत ठेवण्यासाठी आणि एमव्ही रूएनला शोधण्यासाठी सागरी गस्ती विमान पाठवले आहे. अपहरण होत विमानावर नजर ठेवण्यासाठी १५ डिसेंबर रोजी विमानाने उड्डाण घेतले आहे. विमानाकडून जहाजाच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. अदनच्या खाडीमध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकाने या जहाजाला एमव्ही रूएनला रोखले. इतर यंत्रणेच्या मदतीने जहाजाच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.