हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी ‘अम्मां’कडून स्फूर्ती घेऊनच!
By admin | Published: August 2, 2016 11:07 PM2016-08-02T23:07:49+5:302016-08-02T23:08:09+5:30
चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले
अण्णाद्रमुक आमदाराचा दावा : जयललितांचे गुणगान
चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले, असा अफलातून दावा अण्णा द्रमुक पक्षाच्या एका आमदाराने मंगळवारी केला.
सत्ताधारी अण्णाद्रमुकचे कन्नूरचे आमदार ए. रामू विधानसभेत म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या हिलरी क्लिंटन या पहिल्या महिला आहेत. त्यामुळे पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रीने घेतलेली गरुडझेप म्हणून संपूर्ण जगात क्लिंटन यांचे कौतुक होत आहे. पण क्लिंटन यांच्या उमेदवारीमागे ‘अम्मा’ हेच एकमेव कारण आहे, असे मी गौरवाने नमूद करू इच्छितो. हिलरी क्लिंटन याआधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना जुलै २०११ मध्ये भारत भेटीवर आल्या होत्या. त्यावेळी २० जुलै रोजी चेन्नईत त्यांची आणि मुख्यमंत्री जयललिता यांची तासभर भेट झाली होती.
या भेटीचा संदर्भ देत रामू म्हणाले की, आज संपूर्ण जग त्या ऐतिहासिक भेटीचे गुणगान करीत आहे. त्या भेटीत हिलरी क्लिंटन यांना ‘अम्मां’च्या व्यक्तिमत्वाची जवळून ओळख झाली व ‘अम्मां’चे इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून व त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने हिलरी थक्क झाल्या. ‘अम्मां’च्या आश्वासक संभाषणातून स्फूर्ती घेऊन अमेरिकेला परतलेल्या हिलरी आज तेथील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्या आहेत. त्यामुळे हिलरी यांच्या उमेदवारीमागे ‘अम्मा’ हेच एकमेव कारण आहे, हे आवर्जून नमूद करायला हवे! रामू यांचे हे भाषण ऐकायला जयललिता स्वत: विधानसभेत हजर होत्या. पण त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हिलरी क्लिंटन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर जयललिता यांनी पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले होते. अमेरिकेतील दोनपैकी एका प्रमुख राजकीय पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी तुम्हाला मिळणे ही गोष्ट सर्व जगातील व खास करून लोकशाहीवादी देशांमधील तमाम स्त्रियांसाठी अत्यंत अभिमानाची व समाधानाची आहे, असे जयललिता यांनी त्या पत्रात नमूद केले होते. (वृत्तसंस्था)
-------------
व्यक्तिपूजेची परिसीमा
राजकारणात कार्यकर्ते आणि अनुयायांनी नेत्याचे लांगुलचालन करणे अभिप्रेतच असते. अण्णा द्रमुकसारख्या व्यक्तिकेंद्रित पक्षात तर असे लांगुलचालन हेच भाग्योदयाचे भांडवल ठरते. तरीही कन्नूरचे आमदार ए. रामू यांनी वरील दावा करून व्यक्तिमहात्म्याची परिसीमा गाठली, असेच म्हणावे लागेल. रामू हे पक्षात दोनच वर्षांपूर्वी आले आहेत व ही त्यांची पहिलीच आमदारकी आहे.