हिमाचल भाजपाचे! भाजपाला मिळाल्या ४४ जागा, काँगेस घसरली २१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:32 AM2017-12-19T01:32:51+5:302017-12-19T01:33:18+5:30
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेवरून दूर करून, सत्ता ताब्यात घेण्यात भाजपाला यश आले. ६८ जागांच्या विधानसभेतील ४४ जागा भाजपाने जिंकल्या. गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकल्या असून, मार्क्सवादी पक्षाने १ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या. सरकार स्थापनेसाठी ३५ जागांची गरज आहे. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या ३६ तर भाजपाच्या २६ जागा होत्या.
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेवरून दूर करून, सत्ता ताब्यात घेण्यात भाजपाला यश आले. ६८ जागांच्या विधानसभेतील ४४ जागा भाजपाने जिंकल्या. गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकल्या असून, मार्क्सवादी पक्षाने १ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या. सरकार स्थापनेसाठी ३५ जागांची गरज आहे. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या ३६ तर भाजपाच्या २६ जागा होत्या.
या निवडणुकीतील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा सुजानपूर मतदार संघात काँग्रेसचे राजिंदर राणा यांच्याकडून ३,५०० मतांनी पराभव झाला. धुमल यांचा हमीरपूर पारंपरिक मतदारसंघ, परंतु या वेळी त्यांनी तो बदलला. मतदानाच्या फक्त ९ दिवस आधी धुमल यांना पक्षाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते.
राज्याचे सहा वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळलेले वीरभद्र सिंह आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे दोघे विजयी झाले आहे. वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असून, त्याची चौकशीही विविध गुप्तचर यंत्रणांकडून सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात आपण सत्तेवर येणे शक्य नाही, असे काँग्रेस नेत्यांनी गृहितच धरले होते. त्यामुळेच काँग्रेसचे फारसे नेते तिथे प्रचाराला गेले नव्हते, तसेच तेथील सारी जबाबदारी वीरभद्र सिंह यांच्याकडेच सोपविली होती.
पराभव अनपेक्षित असून, पक्ष त्यावर आत्मपरीक्षण करेल, असे सांगून धुमल यांनी भाजपाच्या विजयी उमेदवारांचे व पक्ष कार्यकर्त्यांचे जोरदार विजयाबद्दल अभिनंदन केले.
कुटलेहार मतदार संघातून विजयी झालेले वरिंदर कंवर यांनी प्रेमकुमार धुमल यांच्यासाठी आपली जागा सोडण्याची तयारी दाखविली. अर्थात, पराभूत उमेदवाराला म्हणजेच धुमल यांना भाजपाकडून मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हिमाचलमध्ये ‘गड आला, पण सिंह गेला’
मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार धुमल पराभूत
सिमला : हिमाचल प्रदेशात भाजपाला भलेही बहुमत मिळाले असेल, पण पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल हे पराभूत झाल्याने, भाजपाच्या विजयावर विरजण पडले आहे. इथे ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी पक्षाची स्थिती आहे.
प्रेमकुमार धुमल यांना सुजानपूरमधून काँग्रेसचे उमेदवार राजिंदर राणा यांचे कडवे आव्हान होते. धुमल यांनी यंदा आपला पारंपरिक मतदारसंघ हमीरपूरऐवजी सुजानपूरमधून निवडणूक लढविली.
मतमोजणीत सुरुवातीपासूनच राजिंदर राणा यांनी आघाडी घेतली. प्रेमकुमार धुमल (७३) हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून, राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे.
2007-12
या काळात प्रेमकुमार धुमल हे राज्यात मुख्यमंत्री होते. यंदाही राज्यातील प्रचाराची
धुरा ज्या प्रमुख
नेत्यांवर होती, त्यात धुमल यांचा समावेश आहे.
1982
च्या सुमारास भाजयुमोच्या माध्यमातून सक्रिय राजकारण करणाºया धुमल यांनी अल्पावधीतच राजकारणात आपले अस्तित्व निर्माण केले.
1993
मध्ये ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि १९९८ मध्ये मुख्यमंत्री झाले. धुमल हे २००७ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०१२ च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला.
यंदाच्या निवडणुकीत भाजपाने धुमल यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले. राज्यात त्यांच्या नेतृत्वात लढलेली ही लढाई भाजपाने जिंकली असली, तरी धुमल यांच्या पराभवाने पक्षांतर्गत अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत.
प्रत्येक निवडणुकीत सरकार बदलण्याची हिमाचल प्रदेशची परंपरा आहे. १९९० मध्ये भाजपाने काँग्रेसला आणि १९९३ मध्ये भाजपाला काँग्रेसने पराभूत केले होते. भाजपाने १९९८ मध्ये हिमाचल विकास काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते, तर २००३ मध्ये काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळविली. पुन्हा २००७ मध्ये भाजपा सत्तेवर आला होता.
हिमाचलच्या
मुख्यमंत्रिपदी नड्डा की ठाकूर?
धुमल यांचा पराभव झाल्यामुळे हिमाचलचे मुख्यमंत्रिपद जे. पी. नड्डा वा जयराम ठाकूर यांच्याकडे येण्याची शक्यता आहे़ नड्डा हे केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत, तर ठाकूर भाजपाचे सक्रिय नेते आहेत़ धुमल यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासमंत्री होते़ निकालानंतर त्यांना घाईघाईने दिल्लीत बोलावल्यामुळे त्या दोघांच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे़