"संपूर्ण गाव डोळ्यासमोर वाहून गेलं, फक्त माझं घर उरलं पण..."; मन हेलावून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:48 PM2024-08-03T12:48:22+5:302024-08-03T12:49:47+5:30
शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेने लोकांच्या मनावर खोलवर जखमा झाल्या आहेत. काहींनी आपलं कुटुंब गमावलं आहे, तर काहींचं अख्ख गाव वाहून गेलं आहे. शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे.
अनिता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण गावात आता फक्त माझंच घर राहिलं आहे. बाकी सर्व माझ्या डोळ्यासमोर वाहून गेलं. बुधवारी रात्री मी माझ्या कुटुंबासोबत झोपले होते. ढगांचा गडगडाट झाला आणि घर हादरलं. काही लोक धावत आमच्या घराकडे आले. बाहेर पाहिलं तर संपूर्ण गाव वाहून गेल्याचे दिसलं. आम्ही घरातून निघालो आणि गावातील भगवती काली माता मंदिरात गेलो आणि संपूर्ण रात्र तिथेच घालवली.
समेज गावातील बक्शी राम यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील १४ ते १५ जण पुरात वाहून गेले आहेत. रात्री दोन वाजता घटनेची माहिती मिळाली. समेजमध्ये पूर आला होता, मी रामपूरला होतो. त्यामुळेच मी वाचलो आहे. पहाटे चार वाजता येथे पोहोचलो तेव्हा सगळं संपलं होतं. आता मी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत आहे. अजूनही मदतकार्य सुरू आहे.
बुधवारी रात्री राज्यातील कुल्लू, मंडी आणि शिमला या तीन जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली होती. त्यानंतर अचानक पूर आला. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या तीन जिल्ह्यांत ढगफुटीमुळे आलेल्या पुरानंतर ४९ लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी बचाव कर्मचाऱ्यांनी ड्रोन तैनात केले आहेत. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.