रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड, परिसरात उडाली खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:52 AM2024-01-25T10:52:14+5:302024-01-25T11:00:54+5:30
कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला.
नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पांवटा साहिब येथे असलेल्या हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये मोठा गोंधळ झाला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९० फार्मसी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाने शिक्षा आणि दंड ठोठावला. या घटनेमुळे कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, २२ जानेवारीला कॉलेज व्यवस्थापनाने जवळपास ९० विद्यार्थ्यांना कॉलेजबाहेर राहिल्याबद्दल २५०० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, दंड न भरल्यास कॉलेज सोडण्याची धमकीही दिली. कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला.
विशेष म्हणजे, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. तसेच, यानिमित्ताने राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पांवटा साहिबमध्ये हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित असलेल्या जवळपास ९० विद्यार्थ्यांवर कारवाई केली. सुट्टी जाहीर करूनही परवानगी न घेता गैरहजर राहिल्याने कॉलेजने विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्याचे म्हटले जात आहे. २३ जानेवारीला सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आले. तसेच, २५०० रुपयांचा दंड भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला आणि दंड न भरल्यास कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
दुसरीकडे, कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिक हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. विविध हिंदू संघटनांच्या लोकांनी कॉलेजच्या गेटवर निदर्शने करत कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुलांना हजेरी लावण्यासाठी कॉलेजने तालिबानी आदेश देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. हिंदू संघटनांचे लोक कॉलेजच्या एचओडीला बडतर्फ करण्याची आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान, प्रकरण चिघळत असल्याचे पाहून स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप केला. डीएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांशी तसेच कॉलेज प्रशासनाशी चर्चा केली. सध्या हे प्रकरण शांत झाले असून चौकशी सुरु आहे. तसेच, कॉलेजच्या एचओडीला ५ फेब्रुवारीपर्यंत रजेवर पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. तहसीलदार ऋषभ शर्मा यांनी प्रकरण शांत झाले असून तपास केला जात असल्याचे सांगितले. तर कॉलेजचे उपाध्यक्ष फार्मा डॉ. अभिनय पुरी यांनी सांगितले की, कॉलेजने आपल्या स्तरावर एक समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाईल.