कोट्यधीश चहावाला बनला भाजपाचा उमेदवार; संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 04:52 PM2022-10-23T16:52:28+5:302022-10-23T16:53:12+5:30
भाजपाचे मंत्री सुरेश भारद्वाज यांच्या जागी संजय सूद यांना तिकीट देण्यात आले असून ते गेल्या चार वेळा या जागेवरून निवडणूक लढवत होते.
शिमला - टी शॉपचा मालक असल्या कारणाने त्यांना लोक चहावाला म्हणतात परंतु ते कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिमला जागेवरून संजय सूद नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. संजय सूद हे चहाचं दुकान चालवतात परंतु निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची आणि पत्नीची मिळून एकूण २.७ कोटी मालमत्ता असल्याचं जाहीर केले आहे. संजय सूद यांच्याकडे १.४५ कोटी रुपयांची स्थावर आणि ५४ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
संजय सूद यांच्या पत्नी सुनीता यांच्याकडे ४६ लाख रुपयांची जंगम आणि २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शुक्रवारी संजय सूद यांनी शिमला मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. भाजपाचे मंत्री सुरेश भारद्वाज यांच्या जागी त्यांना तिकीट देण्यात आले असून ते गेल्या चार वेळा या जागेवरून निवडणूक लढवत होते.
सुरेश भारद्वाज कासुंप्तीमधून निवडणूक लढवणार
सुरेश भारद्वाज यांना यावेळी कासुंप्तीतून तिकीट मिळाले आहे. संजय सूद म्हणाले, 'भारद्वाज देखील मला शिमलासाठी माझी निवड होण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची आशा करतो असं त्यांनी म्हटलं.
संजय सूद १९९१ पासून चहाचे दुकान चालवत आहेत. पूर्वी ते बसस्थानकावर वर्तमानपत्र विकायचे. आपल्या संपत्तीबाबत संजय सूद सांगतात की, काळानुसार मी बरीच बचत केली आहे. मी मालमत्ता विकत घेतली तेव्हा तिची किंमत फारशी नव्हती. मी दररोज १०० रुपये टपाल बचतीत जमा करायचो. लोक तुमच्या संघर्षाकडे बघत नाहीत तर यशाकडे पाहतात अशी म्हण आहे ती मला जुळते असं त्यांनी सांगितले.
काँग्रेस उमेदवाराकडे दुप्पट मालमत्ता
या जागेवरून काँग्रेसने हरीश जनार्था यांना उमेदवारी दिली असून त्यांची मालमत्ता संजय सूद यांच्यापेक्षा दुप्पट आहे. त्यांच्याकडे एकूण ४.७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यापैकी २.४ कोटी रुपये जंगम आणि २.३ कोटी स्थावर आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"