Himachal Pradesh Election: ईव्हीएम खासगी वाहनात! हिमाचलमध्ये सहा निवडणूक कर्मचारी निलंबित; विरोधक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:24 AM2022-11-14T08:24:10+5:302022-11-14T08:24:40+5:30
Himachal Pradesh Election 2022: खासगी वाहनात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आढळल्याने निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील सहा निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबितांत दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
- बलवंत तक्षक
चंडीगड : खासगी वाहनात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आढळल्याने निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील सहा निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबितांत दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
रामपूर विधानसभा मतदारसंघातील दत्तनगर गावचे हे प्रकरण आहे. तेथील निवडणूक पथकात समावेश असलेल्या जगतराम, इंदरपाल, राजेश कुमार, प्रदीपकुमार, विपिन आणि गोवर्धनसिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनात ईव्हीएम सापडल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तासभर गोंधळ घातला. निवडणूक निरीक्षक भावना गर्ग यांनी पुढाकार घेत वाद मिटवला. यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीअंती सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
खासगी वाहनात ईव्हीएम सापडल्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही बाब सहायक निवडणूक अधिकारी सुरेंद्र मोहन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तेव्हा त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना जीपीएस बसविलेल्या शासकीय वाहनात ईव्हीएम ठेवण्याचे आदेश दिले. आयोगाकडून या ईव्हीएमची तपासणी केली
जाणार आहे.
अधिकारी काय म्हणतात?
nया प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार नंदलाल व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून गोंधळ सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक निवडणूक अधिकारी आणि पोलिस उपअधीक्षकही घटनास्थळी पोहोचले.
nनिवडणूक निरीक्षक भावना गर्ग यांनी खासगी वाहनातून ईव्हीएम आणणे नियमांच्या विरोधात असल्याचे मान्य केले.
बेरीज-वजाबाकी सुरू...
चंडीगड : हिमाचल प्रदेशातील मतदानानंतर सर्व उमेदवार आपापल्या विजयाच्या बेरीज-वजाबाकीत गुंतले आहेत. मतदान झाल्यानंतर काँग्रेस व भाजप नेते हिमाचलात सरकार बनविण्याचा दावा करीत आहेत. जातीय व प्रादेशिक समीकरणांच्या हिशेबाने विजय निश्चित असल्याचे गणित सांगितले जात आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल येईपर्यंत ही चर्चा सुरूच राहणार आहे.
येथे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का मतदान जास्त झाले. ज्या जागांवर चारपेक्षा अधिक उमेदवार मैदानात आहेत, तेथे हार-जीतचा फैसला फार कमी मतांनी होणार आहे.
भाजपचे डबल इंजिन खराब झाले असून, तेल-पाणी बदलण्याऐवजी इंजिनच बदलावे लागेल, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे की, जनतेने यावेळी बदल करण्यासाठी मतदान केलेले आहे.
नड्डा म्हणतात - लोकांनी मोदींना आशीर्वाद दिला
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, हिमाचलात लोकांनी पुन्हा एकदा भाजपला आशीर्वाद दिला आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा तेव्हा लोक त्यांनाच आशीर्वाद देतात. मोदींमुळे हिमाचल मुख्य प्रवाहात आले. राज्यात विकास झाला व ज्यांचा कधी विचारही केला नव्हता असे मोठमोठे प्रकल्प येथे आलेले आहेत. त्याचमुळे लोक भाजपला पुन्हा एकदा आशीर्वाद देतील.
दावे-प्रतिदावे
हिमाचलात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. या वेळी भाजप परंपरा तोडण्याचा तर काँग्रेस सरकार बदलण्याचा दावा करीत आहे. विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री म्हणतात की, भाजप सत्तेतून बाहेर गेली आहे. आता फक्त घोषणा व्हायची आहे. या दाव्या-प्रतिदाव्याने नड्डा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.