हिमाचल प्रदेश निवडणुकीत 73 वर्षीय धूमल भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे असणार उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 09:08 PM2017-10-31T21:08:58+5:302017-10-31T21:11:45+5:30
शिमला- हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. भाजपानं एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे.
शिमला- हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. भाजपानं एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. 73 वर्षीय प्रेमकुमार धूमल हे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. ते राजगडमध्ये बोलत होते. तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून वीरभद्र सिंह हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं होतं.
अमित शाह यांनी वीरभद्र सिंह यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. वीरभद्र स्वतः केलेल्या कामांचा हिशेब देत नाहीत. तसेच भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. मात्र भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढत आहे, हा प्रश्न नेहमीच विचारतात. भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये 'प्रेमकुमार धूमल' यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत आहे, हेच माझं त्यांना हे प्रत्युत्तर आहे. भाजपा देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, तर हिमाचल प्रदेशमध्ये धूमल यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवत असल्याचं शाहांनी सांगितलं.
धूमल यांनी हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्रिपद याआधी सांभाळलं आहे. सध्या ते विरोधी पक्षनेते असून, येत्या 18 डिसेंबरला ते पुन्हा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रेमकुमार धूमल यावेळी हमीरपूर या आपल्या पारंपरिक मतदारसंघाऐवजी सुजानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आलेला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं इच्छुकांपैकी 68 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह यांनी या उमेदवारांची यादीची घोषणा केली असून, यादीत मोठ्या नावांचा समावेश आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्तीच्या ऊनामधून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. अनेक मोठ्या नेत्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत. सध्याचे विद्यमान आमदार रिखी राम कोंडल यांचीही झंडुता मतदारसंघातून नाव वगळण्यात आलं आहे. तसेच सुंदरनगरहून रुप सिंह ठाकूर व कुल्लूमधून बंजारच्या खिमी राम शर्मा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच सहा महिला उमेदवारांनाही भाजपानं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.