हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 9 नोव्हेंबर रोजी होणार मतदान, पहिल्यांदाच संपूर्ण निवडणुकीत होणार VVPAT चा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 04:32 PM2017-10-12T16:32:04+5:302017-10-12T17:15:20+5:30
हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल, असे वृत्त होते. मात्र आज केवळ हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्याच तारखा जाहीर झाल्या.
मुख्य निवडणूक आयक्त अचल कुमार ज्योती यांनी आज हिमाचल प्रदेशमधील निवडणूक प्रक्रियेची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमध्ये आजपासूनच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे 68 सदस्य असून, तेथे सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांमध्ये चुरस असेल. हिमाचल प्रदेशमध्ये 7 हजार 251 मतदान केंद्रे असतील. राज्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होईल. मतदान, नामांकन आणि प्रचार फेऱ्यांचे चित्रिकरण होईल.
हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात प्रथमच संपूर्ण निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे. मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने योग्य व्यवस्था केली आहे, एका मतदार संघातील मतपत्रिकांची संपूर्ण मोजणी होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. तसेच इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर दाखवण्यात आले आहे. व्हीव्हीपॅट मशीनवर कुणाला मत दिले आहे. त्याची माहिती मतदाराला मिळेल.
हिमाचल प्रदेशमधील निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे
- 16 ऑक्टोबरपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल
- 23 ऑक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार
- 24 ऑक्टोबर रोजी नामांकन पत्रांची छाननी
- 26 ऑक्टोबर ही नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख असेल
- 9 नोव्हेंबर रोजी मतदान
- 18 डिसेंबर मतमोजणी
#WATCH Live via ANI FB: Election Commission's press conference on Gujarat & Himachal Pradesh assembly elections https://t.co/3mo97GEPcVpic.twitter.com/t8j4z4c5Zc
— ANI (@ANI) October 12, 2017