सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय; वरिष्ठ नेत्याचा घरचा अहेर
By देवेश फडके | Published: February 24, 2021 10:39 AM2021-02-24T10:39:59+5:302021-02-24T10:42:04+5:30
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली. मोदी लाटेमुळे २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्येही मोठा विजय भाजपला मिळवता आला. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी पक्षाच्या आताच्या धोरणांवर टीका करत सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पालमपूर :नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली. मोदी लाटेमुळे २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्येही मोठा विजय भाजपला मिळवता आला. पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य तसेच वरिष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी पक्षाच्या आताच्या धोरणांवर टीका करत सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतेय, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. (himachal pradesh former cm shanta kumar slams bjp on policy)
भारतीय जनता पक्ष राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे. ही केवळ सुरुवात आहे. राजकीय प्रदुषणाचा माझ्यासारख्या काही जणांना अतिशय त्रास होतोय. आम्ही काम केलेला आणि वाढवलेला हाच भाजप आहे का, असे अनेकदा मनात येते, अशा शब्दांत पक्षाच्या आताच्या धोरणांवर शांता कुमार यांनी हल्लाबोल केला. शांता कुमार यांचे आत्मकथन असलेल्या 'निज पथ का अविचल पंथी' या पुस्तकारचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
''सरकारशी सहमत नाही म्हणून प्रत्येकाला कारागृहात डांबू शकत नाही''
सिद्धांताशी तडजोड नको
आपल्या सिद्धांताशी कधीही तडजोड करता कामा नये, असा सल्ला शांता कुमार यांनी यावेळी पक्षाला दिला. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात भाजप हा आशेचा शेवटचा किरण आहे. भारतातील संपूर्ण राजकारण भरकटून दिशाहीन झाले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी तसेच विरोधकांना कमीपणा आणण्यासाठी दंगली घडवल्या जातात. नेत्यांची खरेदी-विक्री केली जात आहे. आणखी नेमके राजकारण काय काय सुरू आहे, याचा नेम नाही. संपूर्ण देशात भ्रष्ट राजकारण सुरू असताना भाजपच केवळ शेवटचा आशेचा किरण असल्याचे मत शांता कुमार यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे.
संघाचे मार्गदर्शन कमी झाले
एक काळ होता, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख नेते भाजपची धोरणे आणि सिद्धांत यावर लक्ष ठेवून असायचे. भाजपने सिद्धांताशी तडजोड करू नये, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. मात्र, हळूहळू संघाचे मार्गदर्शन कमी होऊ लागले आहे. एकूण परिस्थिती पाहता अतिशय चिंता वाटते, असे शांता कुमार यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींचे कौतुक
२०१४ मध्ये भाजपने प्रथमच ऐतिहासिक विजय प्राप्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला कुशल नेतृत्व लाभले. देशाने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुसद्देगिरीचे शांता कुमार यांनी कौतुक केले आहे.