अटल बोगद्याचा फलक सरकार पुन्हा लावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:40 AM2022-12-14T05:40:22+5:302022-12-14T05:40:37+5:30
सुखविंदरसिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि फलकाचा मुद्दा उपस्थित केला.
सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी स्पष्ट केले आहे की, यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी २८ जून २०१० रोजी ज्या अटल बोगद्याची पायाभरणी केली होती, त्याचा फलक आता पुन्हा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू म्हणाले की, हा फलक गहाळ आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. तो लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे. संबंधित विभागाला या निर्णयाचे पुनरावलोकन करून मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडण्यास सांगितले आहे. आगामी काही दिवसांत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
सुखविंदरसिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि फलकाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हा ९.०२ किमीचा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने बांधला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी यांनी मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिक्खू यांची भेट घेतली. या वेळी त्यांचे पुत्र विक्रमादित्य हेही उपस्थित होते.
प्रकरण काय?
३ ऑक्टोबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बोगद्याचे उद्घाटन झाले होते. या वेळी प्रदेश काँग्रेसने असा आरोप केला होता की, सोनिया गांधी यांच्या हस्ते २०१० मध्ये पायाभरणी झाली होती, त्याचा फलक काढून टाकण्यात आला.
सोनिया गांधी यांच्या हस्ते २०१० मध्ये झालेल्या पायाभरणी समारंभास तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री वीरभद्र सिंह यांची उपस्थिती होती.