कंगना रनौत प्रचारात परिधान करतात हिमाचली टोपी, लोकनृत्यातही सहभागी, ‘हिमाचल की बेटी’ ही प्रतिमा मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:24 AM2024-04-05T08:24:43+5:302024-04-05T08:25:51+5:30
Himachal Pradesh Lok Sabha Election 2024: मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना रनौत यांनी ‘हिमाचल की बेटी’ ही आपली प्रतिमा जनमानसात अधिक रुजविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
शिमला - मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना रनौत यांनी ‘हिमाचल की बेटी’ ही आपली प्रतिमा जनमानसात अधिक रुजविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्या आवर्जून हिमाचली टोपी घालत असून गावकऱ्यांबरोबर हिमाचल ‘धाम’ या थाळीचा आस्वाद घेतात. त्या विविध समारंभांमध्ये लोकनृत्यात स्थानिक महिलांसोबत सहभागी होत आहेत.
सरकाघाट विधानसभा मतदारसंघातील भाम्बला गावच्या मूळ रहिवासी असलेल्या कंगना रनौत यांनी याआधी अनेकदा सांगितले होते की, मी सक्रिय राजकारणात सहभागी होणार आहे. कंगना रनौत प्रचारकार्यात सहभागी होताना कॉटनची साडी किंवा ड्रेस परिधान करतात. त्यांच्या व्हाइट पर्ल नेकलेस, तसेच इअर रिंग्जची देखील चर्चा होताना दिसते. आपले राहणीमान साधे असल्याचे त्या बिंबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वाद निर्माण होणार नाही याची काळजी
कंगना रनौत यांच्या प्रचारकार्यात भाजपचे स्थानिक नेते व हिमाचल प्रदेशमधील विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर सहभागी झाले आहेत. कंगना रनौत यांनी राजकीय तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर वेळोवेळी मतप्रदर्शन केेले. त्यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे वादंगही निर्माण झाले होते.
मात्र, निवडणुकीत प्रचार करताना कोणताही वाद निर्माण होणार नाही याची त्या अतिशय काळजी घेत आहेत. कंगना रनौत यांची लढत राणी प्रतिभा सिंह यांच्याशी होणार आहे. प्रतिभासिंह याआधी तीनदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.