हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं रौद्ररुप! मणिकर्णमध्ये ढगफुटी, 4 जण बेपत्ता; घराचं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:02 AM2022-07-06T11:02:45+5:302022-07-06T11:04:17+5:30
Himachal Pradesh Rain : कुल्लूच्या मणिकर्ण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून नाल्याला आलेल्या भीषण पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं आहे. मुसळधार पाऊस पडत आहे. कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरामुळे कॅम्पिंग साईट वाहून गेली असून चार जण बेपत्ता आहेत. कुल्लूचे एडीएम प्रशांत सरकैक यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लूच्या मणिकर्ण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून नाल्याला आलेल्या भीषण पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चार जण बेपत्ता झाल्याची माहिती लोकांनी प्रशासनाला दिली आहे. त्याचवेळी काही घरंही पाण्याखाली गेली असून गावाकडे जाणाऱ्या पुलाला तडे गेले आहेत. गावकऱ्यांनी तातडीने कुल्लू प्रशासनालाही याबाबत सर्व माहिती दिली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. रात्रीपासून कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर मलाणा येथील धरणाच्या जागेचे मोठे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शिमला, सोलन, सिरमौर, बिलासपूर आणि कांगडा येथे येत्या तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने लोकांना नदी-नाल्यांजवळ न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यात हिमाचलमध्ये 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रस्ते अपघातांचाही समावेश आहे. आतापर्यंत 1 कोटी 32 लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
कुल्लू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्यांची ओळख पटली आहे. यामध्ये मंडीतील सुंदरनगरचा रोहित, राजस्थानमधील पुष्करचा कपिल, धर्मशाळेचा रोहित चौधरी, कुल्लूच्या बंजार येथील अर्जुन नावाचा युवक बेपत्ता आहे. याशिवाय या परिसरात सहा ढाबे, तीन छावण्या आणि एका गोठ्यात बांधलेल्या चार गायी वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर गेस्ट हाऊससह इतर काही घरांचेही नुकसान झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.