हिमाचलच्या छितकुलमध्ये ट्रेकिंगला गेलेले 11 जण बेपत्ता, ITBP ची शोध मोहिम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:51 AM2021-10-21T09:51:23+5:302021-10-21T10:21:51+5:30
समुद्र सपाटीपासून सुमारे 20 हजार फूट उंचीवर असलेल्या लामखागा पास शिखरावर ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती आहे.
किन्नौर:हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील चीन सीमेवर असलेल्या चितकुलमध्ये ट्रेकिंगला गेलेल्या 8 पर्यटकांसह एकूण 11 लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 20 हजार फूट उंचीवर असलेल्या लामखागा पास शिखरावर ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती आहे. ही टीम लामखागा पासकडे ट्रेकिंग करण्यासाठी बाहेर पडली होती, परंतु 17, 18 आणि 19 रोजी खराब हवामानामुळे ही टीम बेपत्ता झाली आहे. संघात आठ सदस्य, एक स्वयंपाकी आणि दोन मार्गदर्शक आहेत. सध्या या ट्रेकर्सचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) ची मदत मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या टीमसोबत गेलेले हिमाचलचे सहा पोर्टर पर्यटकांचे सामान सोडून 18 ऑक्टोबर रोजी चितकुलमधील रानीकांडा येथे पोहोचले. पर्यटक आणि स्वयंपाकी 19 ऑक्टोबरपर्यंत चितकुलला पोहोचतील अशी अपेक्षा होती, परंतु बुधवारी सकाळपर्यंत पर्यटक संघ आणि स्वयंपाक कर्मचाऱ्यांशी संपर्क झाला नाही. बेपत्ता झालेले 8 ट्रेकर्स दिल्ली आणि कोलकाताचे रहिवासी आहेत. हे सर्व 11 ऑक्टोबर रोजी हर्सीलहून चितकुलला निघाले होते. 19 ऑक्टोबरला तेथे पोहचणार होते, परंतु मंगळवारी ते तेथे पोहोचले नाहीत. त्यानंतर ट्रेकिंग आयोजकांनी उत्तरकाशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला याबद्दल माहिती दिली.
कोण-कोण बेपत्ता आहेत?
अनिता रावत (38), कोलकाताच्या मिथुन दारी (31), तन्मय तिवारी (30), विकास मकाल (33) सौरव घोष (34) सवियन दास (28), रिचर्ड मोंडल (30, सुकेन मांझी (43), हे पर्यटक आणि देवेंद्र (37), ज्ञानचंद्र (33), उपेंद्र (32) अशी स्वयंपाकींची नावे आहेत. ते उत्तरकाशीतील पुरोलाचे रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते लखवागा खिंडीजवळ अडकले आहेत. जिल्हा उपायुक्त आबिद हुसेन सादिक यांनी सांगितले की, आयटीबीपी आणि पोलीस बचाव कार्य गुरुवारी सकाळी सुरू करतील.
ITBP ची शोध मोहिम सुरू
पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणच्या आठ पर्यटकांची टीम 11 ऑक्टोबर रोजी मोरी सांक्रीच्या ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून हर्सीलला रवाना झाली होती. या टीमने 13 ते 21 ऑक्टोबर दरम्यान लामखागा खिंडीपर्यंत ट्रेकिंगसाठी वन विभाग उत्तरकाशी कडून इनर लाइन परमिट देखील घेतले होते. 17 ते 19 ऑक्टोबर या काळात खराब हवामानामुळे ही टीम भरकटली. ट्रेकिंग टीमशी कोणताही संपर्क झाला नाही. यानंतर, सुमित हिमालयन ट्रॅकिंग टूर एजन्सीने उत्तराखंड सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारला पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कळवले आहे.