हिमाचल प्रदेशात गडकरींसमोरच राडा, SP अन् मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यात लाथा-बुक्क्यांनी हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 07:23 PM2021-06-23T19:23:03+5:302021-06-23T19:23:11+5:30
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सुरक्षेत तैनात असलेले सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी गौरव यांच्यात जबरदस्त हाणामारी
कुल्लू - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या स्वागतासाठी भुंतर येथे गेलेल्या मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सुरक्षेत तैनात असलेले सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी गौरव यांच्यात जबरदस्त हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. अचानक झालेल्या या झटापटीचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यात संरक्षण कर्मचारी एसपींना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. मात्र, ही हाणामारी नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही. (Himachal Pradesh scuffle between cm jairam thakur security officials and kullu SP in front of union minister Nitin Gadkari)
केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितन गडकरी बुधवारी मनाली दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर त्यांच्या स्वागतासाठी ते भुंतर एअरपोर्टवर गेले होते. वाटेत काही फोरलेन प्रभावित शेतकरीही त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. या शेतकऱ्यांना पाहून गडकरींनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले. यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूरही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले.
बढिया भाऊ!! वाहतूक कोंडी पाहून नितीन गडकरी स्वतःच गाडीतून उतरले, अन्...
याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला असलेले सुरक्षा कर्मचारी आणि एसपी कुल्लू यांच्यात अचानकपणे झटापट झाली. मात्र, ही झटापट नेमकी का झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचारी एसपींना लाथ मारताना स्पष्टपणे दिसत आहे.
या घटनेनंतर अफवादेखील उठत आहेत. मात्र, यावर कुणीही भाष्य करायला तयार नाही. घटना समोर आल्यानंतर लोक एसपींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतानाही दिसून आले.