हिमाचलच्या चंबा रुमालाची किंमत ३० हजार: विदेशातूनही आहे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 02:25 PM2022-11-22T14:25:36+5:302022-11-22T14:25:46+5:30
एक चंबा रुमाल बनविण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागतो.
बलवंत तक्षक
चंडीगड : एखाद्या रुमालाची किंमत ३० हजार रुपये असू शकते का, अर्थातच उत्तर नाही असेल; पण हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे रिज मैदानावर हस्तकला प्रदर्शनात भेट दिली तर येथे चंबा रुमालाची किंमत २५ ते ३० हजार रुपये असल्याचे दिसून येते.
एक चंबा रुमाल बनविण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागतो. या हस्तकला मेळ्यात हाताने बनविलेल्या वस्तू लोकांना आकर्षित करीत आहेत. या शिल्प मेळ्यात कुल्लू- किन्नौरी शॉलपासून ते चंबा रुमालपर्यंत अनेक वस्तू आहेत. हा मेळा पाच दिवस चालणार आहे. येथे एक डझनपेक्षा अधिक स्टॉल लागलेले आहेत. सर्वांत अधिक गर्दी चंबा रुमालाच्या स्टॉलवर दिसून येते.
कॉटन आणि खादीच्या रुमालावर रेशमाच्या धाग्यांनी केलेली कारागिरी पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. चंबा रुमाल बनविणाऱ्या कारागीर सुनीता म्हणतात की, रुमालावर भगवान श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांची रासलीला बनविण्यासाठी जवळपास एक महिना लागतो. यासाठी विशेष धागा अमृतसर येथून मागविला जातो. या रुमालांची विदेशातही खूप मागणी आहे. ही कला चंबा येथील महिलांनी आजही जिवंत ठेवली आहे.
बांबूचेही उत्पादन
हस्तकला मेळ्यात बांबूचीही विक्री होत आहे. उना जिल्ह्यातील बंगाणा येथील अजय कुमार यांचे म्हणणे आहे की, बांबूपासून बनविलेल्या उत्पादनांची इतकी मागणी आहे की, कारागीर कमी पडतात. सध्या आमच्याकडे ३० हून अधिक महिला काम करीत आहेत. बांबू उद्योगातून युवकांना रोजगार देण्याचे अजय कुमार यांचे स्वप्न आहे. मात्र, तरुण मुले या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुक नाहीत.