कौतुकास्पद कामगिरी! किराणा दुकानदाराची दोन्ही मुलं झाली न्यायाधीश; आई-बाबांना दिलं श्रेय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:35 PM2023-09-04T13:35:14+5:302023-09-04T13:36:53+5:30
किराणा मालाचं छोटं दुकान चालवणारे नंदलाल ठाकूर यांना आज आपल्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटत आहे.
किराणा मालाचं छोटं दुकान चालवणारे नंदलाल ठाकूर यांना आज आपल्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटत आहे. मुलांनी असं काम केलं आहे की ज्याचा वडील आणि कुटुंबीयांना आनंद होत आहे. नंदलाल यांचा धाकटा मुलगा विकास आधी न्यायाधीश झाला आणि आता मोठ्या मुलाने हे पद मिळवलं आहे. नंदलाल ठाकूर यांचा मोठा मुलगा विशाल याची उत्तर प्रदेश न्यायिक सेवा परीक्षेसाठी निवड झाली आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील कल्लर गावातील एका सामान्य कुटुंबातील नंदलाल ठाकूर हे एक छोटस किराणा दुकान चालवतात. त्यांचा मोठा मुलगा विशाल ठाकूर याची उत्तर प्रदेश न्यायिक सेवेत दिवाणी न्यायाधीश पदावर निवड झाली आहे. त्याच वर्षी धाकटा मुलगा विकास ठाकूर याचीही मध्य प्रदेश न्यायिक सेवेत न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. आता मोठ्या मुलानेही परीक्षेत उत्तीर्ण होऊन आई-वडिलांसह संपूर्ण समाजाचा गौरव केला आहे. विशाल ठाकूरचे वडील नंदलाल ठाकूर हे किराणा दुकानदार असून आई बिंद्रा ठाकूर गृहिणी आहेत.
विशाल ठाकूरने पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून एलएलबी आणि एलएलएमचे शिक्षण घेतले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण लिटल एंजल्स पब्लिक स्कूल, कल्लर आणि त्यानंतर क्रिसेंट पब्लिक बिलासपूर येथून आणि 9वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण झाले. यापूर्वी, विशालने हरियाणा न्यायिक सेवा 2021 मध्ये दिवाणी न्यायाधीशासाठी मुलाखत दिली होती. विशालने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या कुटुंबीयांना दिले आहे.
विशालने सांगितले की, आई-वडिलांच्या संघर्षाचे फळ आहे की आज त्यांची दोन्ही मुलं न्यायाधीश झाली आहेत. विशालने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली येथे LLM प्रवेश परीक्षेत AILET 2021 मध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला होता. जिद्द असेल आणि मेहनत केली तर कुठलंही ध्येय गाठता येतं, असं विशाल सांगतो.
विशालचा धाकटा भाऊ विकास याची फेब्रुवारी 2023 मध्ये मध्य प्रदेश न्यायिक सेवेत निवड झाली. विकास ठाकूरने पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडमधून लॉ ऑनर्स यूआयएलएस (पंजाब युनिव्हर्सिटी) आणि एलएलएमचाही अभ्यास केला आहे. विकास ठाकूरने 2021 साली पंजाब विद्यापीठात झालेल्या एलएलएम प्रवेश परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.