हिमालयाचे वय ४.७ कोटी वर्षे! भूखंडांच्या टकरीतून झाला जन्म

By admin | Published: November 10, 2015 11:05 PM2015-11-10T23:05:09+5:302015-11-10T23:05:09+5:30

वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने हिंदी महासागराच्या तळाशी एका अतिप्राचीन छोट्या भूस्तरीय आवरणाचा शोध लावला असून त्यावरून हिमालयाचा जन्म सुमारे ४.७ कोटी वर्षांपूर्वी झाला असावा

Himalayas 4.7 million years! Birth of a platoon | हिमालयाचे वय ४.७ कोटी वर्षे! भूखंडांच्या टकरीतून झाला जन्म

हिमालयाचे वय ४.७ कोटी वर्षे! भूखंडांच्या टकरीतून झाला जन्म

Next

मेलबर्न : वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने हिंदी महासागराच्या तळाशी एका अतिप्राचीन छोट्या भूस्तरीय आवरणाचा (ओशियानिक मायक्रोप्लेट) शोध लावला असून त्यावरून हिमालयाचा जन्म सुमारे ४.७ कोटी वर्षांपूर्वी झाला असावा, असा नवा सिद्धांत मांडला आहे.
पृथ्वीच्या निर्मितीनंतरच्या सुरुवातीच्या काळात परिवलनीय गतीमुळे भूखंडांच्या परस्पराशी अनेक वेळा टक्कर होत राहिल्या. अशाच प्रकारे अतिप्राचीन काळातील भारतीय भूखंड आणि युरेशिया भूखंड यांच्या टकरीतून हिमालयाचा उदय झाला, हे भूविज्ञानातील जवळजवळ सर्वमान्य गृहितक मानले जाते; मात्र हिमालयाच्या जन्मास कारणीभूत ठरलेली भूखंडांची टक्कर नेमकी केव्हा झाली असावी, यावर वैज्ञानिकांमध्ये एकमत नव्हते. हा काळ ५९ ते ३४ दशलक्ष वर्षांपूर्वीचा असावा, एवढा ढोबळ अंदाज वैज्ञानिकांनी याआधी वर्तविला होता; मात्र हिमालय जन्माला घालणारी ती भूखंडीय महाटक्कर ४७ दशलक्ष (४.७ कोटी) वर्षांपूर्वीची असल्याचे पुरावे हाती लागल्याचा दावा आता वैज्ञानिकांनी केला आहे.
सिडनी विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ जिओसायन्सेस’ आणि अमेरिकेतील स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन आॅफ ओशिओग्राफीच्या वैज्ञानिकांचा हा नवा सिद्धांत मांडणारा शोधनिबंध ‘अर्थ अ‍ॅण्ड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स’ या वैज्ञानिक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. सिडनी विद्यापीठाचे प्रा. दितमार म्युलर व कारा मॅथ्युज आणि स्क्रिप्स इन्स्टिट्यूशनचे प्रा. डेव्हिड सॅण्डवेल यांनी हिमालयाच्या वयाचा हा नवा सिद्धांत जगापुढे मांडला आहे.
मध्य हिंदी महासागराच्या तळाच्या पृष्ठभागावर आढळून आलेल्या एका अतिप्राचीन ‘ओशियानिक मायक्रोप्लेट’वरून हिमालयाच्या जन्माची नवी कुंडली मांडणे शक्य झाले, असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. प्रशांत महासागराच्या तळाशी अशा किमान सात ‘ओशियानिक मायक्रोप्लेट’ असल्याचे ज्ञात होते; परंतु हिंदी महासागराच्या तळाशी आढळून आलेली ही अशा प्रकारची पहिलीच ‘ओशियानिक मायक्रोप्लेट’ आहे. अंतराळात भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून मिळालेल्या रडार बीम मॅपिंगच्या चित्रांमुळे हिंदी महासागरातील या ‘ओशियानिक मायक्रोप्लेट’ तुटक आकृतीबंध एकसंघ पद्धतीने जोडून तिच्या रचनेचा सविस्तर व स्वतंत्रपणे अभ्यास करणे शक्य झाले.
भूखंडांमध्ये सुरुवातीच्या काळात झालेल्या टकरींमुळे पृथ्वीच्या आवरणामध्ये जो तणाव निर्माण झाला तो एवढा प्रचंड होता की, त्यामुळे प्रत्यक्ष टक्कर झाल्याच्या ठिकाणाहून खूप दूर अंटार्क्टिक भूआवरणाला (अंटार्क्टिक प्लेट) तडा गेला व त्याचा साधारणपणे सध्याच्या आॅस्ट्रेलियातील तास्मानिया प्रांताच्या आकाराचा एक तुकडा तुटून तो खूप दूरवर मध्य हिंदी महासागराच्या तळाशी येऊन विसावला. हीच ती वैज्ञानिकांना हिंदी महासागरात आढळून आलेली पहिली अतिप्राचीन ‘ओशियानिक मायक्रोप्लेट’. सागरतळाचे मॅपिंग करण्याच्या शास्त्राचे ज्यांना जनक मानले जाते त्या डॉ. जॅकेलिन मॅमेरिक्स यांच्यावरून वैज्ञानिकांनी हिंदी महासागरातील या ‘ओशियानिक मायक्रोप्लेट’चे ‘मॅमेरिक्स मायक्रोप्लेट’ असे नामकरण केले आहे. (वृत्तसंस्था)
या शोधनिबंधाचे सहलेखक प्रा. सॅण्डवेल म्हणतात, पृथ्वी या आपल्या स्वत:च्या ग्रहाचे जेवढे सविस्तर नकाशे उपलब्ध नाहीत त्याहून सविस्तर प्लुटो ग्रहाचे नकाशे आपल्याकडे आहेत. याचे कारण असे की, पृथ्वीचा ७१ टक्के भूभाग सागरांनी व्यापलेला आहे.
सुमारे ९० टक्के सागरतळ असा आहे जेथून कधीही जहाजवाहतूक होत नाही. महासागरांच्या खोलवरच्या तळांचे संपूर्णपणे सर्वेक्षण करायचे झाल्यास त्यासाठी जहाजांना २०० वर्षे येरझाऱ्या घालाव्या लागतील व त्यासाठी सुमारे दोन ते तीन अब्ज डॉलर एवढा खर्च येईल.
भूसांरचनिक आवरणे ही स्थिर नसून ती हलत असतात. पृथ्वीचे भूखंड सरकून परस्परांना येऊन चिकटण्याची किंवा दूर जाण्याची व प्रसंगी त्यांची टक्कर होण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. भारतीय उपखंड हळूहळू वर सरकून युरेशिया खंडाशी घासला जात आहे.
या हालचालींमुळे जो भूगर्भीय तणाव निर्माण होतो त्याने हिमालयाच्या क्षेत्रांत दरवर्षी असंख्य लहान-मोठे भूकंप होत असतात; पण भारतीय उपखंडाच्या भूभागाचे सर्वात उत्तरेकडील टोक जेव्हा सर्वप्रथम युरेशियाशी धडकले तेव्हा मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठीय तणाव निर्माण झाला याचा अंदाज वैज्ञानिकांच्या या नव्या अभ्यासावरून येतो.
पाच कोटी वर्षांपूर्वी भारतीय भूखंड उत्तरेकडे सरकत असताना जेव्हा तो युरेशिया भूखंडावर जाऊन सर्वप्रथम आदळला तेव्हा भारतीय भूखंड व अंटार्क्टिका भूखंड यांच्या दरम्यानच्या सागरतळातील पर्वतराजींच्या पृष्ठभागावरील तणाव एवढा वाढला की त्याने अंटार्क्टिका भूखंडाच्या आवरणाचा एक तुकडा तुटला व तो बॉल बेअरिंगसारखा गोल फिरू लागला.

Web Title: Himalayas 4.7 million years! Birth of a platoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.