"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 04:03 PM2024-05-19T16:03:38+5:302024-05-19T16:04:06+5:30
Anand Mishra Lok Sabha Election : माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.
Himanta Biswa Sarma In Buxar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्याबाहेर देखील सभा घेत आहेत. बिहारमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांना गंभीर इशारा दिला. मिश्रा हे बिहारमधील बक्सर येथून अपक्ष लोकसभेच्या रिंगणात आहेत. भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणुकीनंतर तुम्हाला पुन्हा एकदा आसामला घेऊन जाईन, असा इशारा सरमा यांनी दिला.
हिमंता बिस्व सरमा म्हणाले की, सर्वांनी भाजपला मतदान करायचे आहे. इथे जो आनंद मिश्रा फिरत आहे त्याला आम्ही निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आसामला घेऊन जाऊ. जे काही करायचे आहे ते तिथेच करा, बिहारमध्ये येऊन भाजपला डिस्टर्ब करू नका. आसाममध्ये त्यांचे अजूनही घर असून त्यांना मी तिथे घेऊन जाईन. तिथेच सुखी राहा इथे येऊन भाजपला डिस्टर्ब करण्यासाठी बक्सरमध्ये फिरत बसू नका.
आनंद मिश्रा निवडणुकीच्या रिंगणात
माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. ते बिहारमधील बक्सर या लोकसभा मतदारंसघातून आपले नशीब आजमावत आहेत. आसाम-मेघालय कॅडरमधील २०११ आर.आर. च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजकीय इनिंग खेळण्याचे ठरवले. त्यांनी राजीनामा दिला तेव्हापासूनच ते लोकसभा निवडणूक लढतील अशी अटकळ बांधली जात होती. राजीनामा दिला तेव्हा मिश्रा आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. आनंद मिश्रा हे मूळचे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील पडसौरा गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण व सांभाळ कोलकाता येथे झाला. आसाममधील डॅशिंग आणि कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकीक मिळवला. येथील नगांव जिल्ह्यात त्यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध केलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली होती. मिश्रा यांच्या वडिलांचे मूळ गाव हे बक्सर जिल्ह्यात आहे. मागील काही महिन्यांपासून माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी बक्सर जिल्ह्यात आपला सक्रिय सहभाग दर्शवल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, बक्सर हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ असून येथील मागील ७ लोकसभा निवडणुकांपैकी ६ वेळा ब्राह्मण उमेदवार विजयी झाला आहे, तेही भाजपाच्या कमळ चिन्हावर. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपा नेते अश्विनी चौबे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या अगोदर भाजपाचे लाल मुनी चौबे हे ४ वेळा येथून संसदेत गेले.