Himanta Biswa Sarma: 'जसं कलम ३७० रद्द झालं, तसंच निजाम आणि ओवेसी देखील नष्ट होतील', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:07 PM2022-01-09T18:07:49+5:302022-01-09T18:08:51+5:30
Himanta Biswa Sarma In Telangana: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी तेलंगणात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं आहे.
Himanta Biswa Sarma In Telangana: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी तेलंगणात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं आहे. देशातून निजाम आणि ओवेसींचं नाव देखील नष्ट होईल तो दिवस आता दूर नाही, असं हेमंत बिस्वा सरमा म्हणाले आहेत. तेलंगणातील वारंगल येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"ज्यापद्धतीनं कलम-३७० हटवलं गेलं, जसं राम मंदिर आता उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. तसंच इथंही निजाम आणि ओवेसींचं नाव कायमचं नष्ट केलं जाईल आणि तो दिवस आता दूर नाही", असं विधान हेमंत बिस्वा सरमा यांनी केलं आहे. वारंगलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. भारतात आता खोटारड्या धरनिरपेक्ष व धार्मिक राजकारण करणाऱ्यांना कधीच खपवून घेणार नाही, असंही ते म्हणाले.
#WATCH | The way Article 370 was scrapped, Ram Mandir's construction began...here also Nizam's name, Owaisi's name will be written off...that day is not very far: Assam CM Himanta Biswa Sarma in Warangal, Telangana pic.twitter.com/RfaI5sMicZ
— ANI (@ANI) January 9, 2022
"बाबर, औरंगजेब आणि निजाम जास्तवेळ टिकू शकले नाहीत हा भारताचा इतिहास आहे. निजामांचं संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल आणि भारतीय सभ्यतावर आधारित नवी संस्कृती जन्माला येईल असं मला वाटतं", असं हेमंत बिस्वा म्हणाले.
हेमंत बिस्वा यांनी यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावरही निशाणा साधला. काहीही झालं तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. "जेव्हा एखादा हुकूमशहा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनतो तेव्हा देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते. थोडं कष्ट सहन करावे लागतील. तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. आपल्या लढाईमुळेच नवं तेलंगणा उभं राहिलं आहे. इंदिरा गांधींसारख्या हुकुमशाही प्रवृत्तीला देखील समुद्रात फेकून दिलं गेलं होतं. भारतात हुकूमशाहीला थारा नाही", असं हेमंत बिस्वा म्हणाले.