हिंडेनबर्ग आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत; पुढचा नंबर कोणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:20 AM2023-03-24T08:20:03+5:302023-03-24T08:20:19+5:30
यापूर्वी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत खुलासा केला होता. त्यामुळे या समूहाला मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली : अदानी समूहातील हेराफेरीवर मोठा खुलासा करून बाजारविश्वात खळबळ माजवलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चने आणखी एका मोठ्या धक्क्याची पूर्वसूचना दिली आहे. हिंडेनबर्गने ट्वीट करत म्हटले की, लवकरच आणखी एक मोठे प्रकरण बाहेर येणार आहे. त्यामुळे नेमके हे प्रकरण कोणत्या कंपनीचे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत खुलासा केला होता. त्यामुळे या समूहाला मोठा झटका बसला आहे.
पुढचा नंबर कोणाचा?
हिंडेनबर्गच्या निशाण्यावर नेमके कोण आहे याबाबत ट्वीटमध्ये माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, गौतम अदानी यांच्या समूहातील हेराफेरी बाहेर काढल्यानंतर हिंडेनबर्ग आणखी एक हेराफेरी समोर आणण्याची शक्यता आहे.
अदानी पॉवरवर देखरेख
अदानी समूहाच्या अदानी पॉवर कंपनीला दुसऱ्यांदा स्टॉक एक्स्चेंज, बीएसई आणि एनएसईने देखरेखीखाली ठेवले आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या मते, गुरुवारपासून (२३ मार्च) अदानी पॉवर अल्प मुदतीच्या एएसएम फ्रेमवर्कच्या पहिल्या टप्प्यात असेल. यापूर्वी अदानी एंटरप्रायझेस आणि विल्मर यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.