हिंडेनबर्गचा अहवाल सत्य मानता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:37 PM2023-11-24T18:37:22+5:302023-11-24T18:38:17+5:30
Supreme Court News: या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समुहामध्ये मोठा भूकंप झाला होता.
या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समुहामध्ये मोठा भूकंप झाला होता. दरम्यान, हिंडेनबर्गचा अहवाल आणि अदानी समूह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात करण्यात आलेल्या गौप्यस्पोटांबाबत याचिककर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हिंडेनबर्गच्या रिपोर्टला सत्य मानता येणार नाही. हिंडेनबर्ग रिपोर्टमधील सत्यता परखण्याचा कुठलाही मार्ग नाही आहे. त्यामुळेच आम्ही सेबीला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, आम्हाला हिंडेनबर्गचा रिपोर्ट तथ्यात्मकदृष्ट्या योग्य मानण्याची आवश्यकता नाही. सेबी याची चौकशी करत आहे. तर दुसरीकडे याचिकाकर्त्यांनी सांगितले की, बाजार नियामक सेबीच्या हालचाली संशयास्पद आहे. कारण त्यांच्याकडे २०१४ पासूनच सविस्तर माहिती आहे. डीआरआयने २०१४ मध्येच सेबीच्या अध्यक्षांसोबत संपूर्ण माहिती शेअर केली होती, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना विचारले की, सेबीच्या तपासावर संशय घेणारे पुरावे कुठे आहेत? सेबीने तपास पूर्ण केलाय, पण खुलासा केलेला नाही, असे याचिकाकर्त्यांनी सांगितल्यावर कोर्टाने हा प्रश्न विचारला होता. तसेच आम्ही तपास करण्याआधीच सेबीच्या तपासाचं विश्लेषण कसं करू शकतो, असंही सुप्रीम कोर्टानं विचारलं.