Hindenburg Research : 'हिंडेनबर्गचा नवा अहवाल देशाविरुद्धचे षड्यंत्र', इंडिया आघाडीला शेअर..." भाजपा नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:17 IST2024-08-12T14:02:52+5:302024-08-12T14:17:11+5:30
Hindenburg Research : काल हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहासह सेबीच्या अधिकाऱ्यांवर मोठा आरोप केला. यामुळे शेअर मार्केटमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Hindenburg Research : 'हिंडेनबर्गचा नवा अहवाल देशाविरुद्धचे षड्यंत्र', इंडिया आघाडीला शेअर..." भाजपा नेत्याचा आरोप
Hindenburg Research : हिंडेनबर्ग रिसर्चने मागील वर्षी अदानी समुहाविरोधात आरोप केले होते. या आरोपानंतर शेअर मार्केटमध्ये गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले आहेत. आता त्यांनी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच आणि अदानी समूहाविरुद्धच्या नवीन अहवालावरून गदारोळ सुरू आहे. मात्र, सेबी प्रमुखांनी यावर स्पष्टीकरण देत ते निराधार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता भाजपने हिंडेनबर्ग रिसर्च आणि इंडिया आघाडीवरही हल्लाबोल केला आहे.
या अहवालावरुन आता भाजपाने हिंडेनबर्ग रिसर्चला धारेवर धरले आहे. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी विरोधकांवरही आरोप केले. 'हे सर्व देशाविरुद्धचे षड्यंत्र आहे. तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडीचे लोक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे टूल किटचे लोक भारताला आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा कट रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
भाजपा नेते रविशंकर म्हणाले की, सोमवारी शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होण्यासाठी हिंडेनबर्ग अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला जातो. रविवारी त्या अहवालावर गोंधळ निर्माण केला जातो.
सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील तपास पूर्ण केल्यानंतर सेबीने जुलैमध्ये हिंडेनबर्गविरुद्ध नोटीस जारी केली होती. आपल्या बचावात उत्तर देण्याऐवजी हिंडेनबर्ग यांनी हा अहवाल सादर केला असून तो पूर्णपणे निराधार आहे, असंही भाजपा नेते म्हणाले.
Hindenburgचा पलटवार
हिंडेनबर्गनं सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर माधबी पुरी आणि सेबीनंही त्यावर प्रतिक्रिया देत हे आरोप हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे अदानी समूहानंही हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु यानंतर हिंडेनबर्गनं पुन्हा एकदा माधबी पुरी बुच यांच्यावर निशाणा साधलाय. 'आमच्या ताज्या अहवालात केलेले आरोप सेबी प्रमुखांनी काही प्रमाणात मान्य केले आहेत,' असा दावा त्यांनी केलाय.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हिंडेनबर्गनं हा दावा करत पुन्हा एकदा निशाणा साधला. सेबी प्रमुखांची गुंतवणूक अदानींशी संबंधित कंपन्यांमध्ये असल्यानं सेबीनं अदानी समूहाच्या रिपोर्टवर कारवाई करण्याचा करण्याची इच्छा व्यक्त केली नाही, असं या अहवालात म्हटलं आहे.