हिंदी दिवस विशेष : हिंदी माध्यमातून युपीएससी पास होणारा 'टॉपर निशांत'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:45 PM2018-09-14T17:45:26+5:302018-09-14T17:46:52+5:30
मेरठमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या निशांत जैनने संघर्ष आणि परिश्रमातून आपले लक्ष्य प्राप्त केले आहे. निशांतचे वडिल एक खासगी नोकरी करत होते
नवी दिल्ली - आज देशात हिंदी दिवस साजरा होत आहे. 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सध्या इंग्रजीचा बोलबाला असल्याने प्रत्येकजण हिंदीपेक्षा इंग्रजी भाषेला प्राधान्य देतो. मात्र, इंग्रजी ही केवळ भाषा असून ज्ञान हे प्रत्येक भाषेत ग्रहण करणे आणि त्याचा उपयोग करुन घेणे, शक्य असल्याचे निशांत जैन याने दाखवून दिले आहे. निशांतने हिंदी माध्यमातून युपीएससी परीक्षेत 13 वी रँक मिळवत हिंदी माध्यमातूनही आपण आले ध्येय गाठू शकते हे दाखवून दिले.
मेरठमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या निशांत जैनने संघर्ष आणि परिश्रमातून आपले लक्ष्य प्राप्त केले आहे. निशांतचे वडिल एक खासगी नोकरी करत होते. त्यामुळे जेवढे मिळेल, त्यात समाधानी असेच त्याचे जीवन होते. लहानपणी निशांत जेव्हा रेशन आणण्यासाठी दुकानात जात त्यावेळी दुकानदार दुकानात नसे, तसेच त्याच्या हेराफेरीचेही किस्से निशांतला ऐकायला मिळत. त्यामुळे निशांतच्या मनात या रेशन दुकानदारबद्दल चीड निर्माण झाली होती. तर, रेशनकार्डवर पुरवठा अधिकारी असे लिहिलेले असल्यामुळे आपणही पुरवठा अधिकारी बनावे असे निशांतला वाटत. त्यातून, निशांतने आपल्या मोठ्या भावाला याबाबत विचारणा केली. त्यावेळी, युपीएससी ही अत्यंत कठिण परीक्षा असते, असे त्याच्या मोठ्या भावाने म्हणजेच प्रशांतने सांगतिले. मात्र, निशांतने निश्चय केला होता. त्यानुसार, राज्यशास्त्र, इतिहास आणि इंग्रजी विषय घेऊन निशांतने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मी माझ्या हिंदी विभागाचे शिक्षक डॉ. रामयज्ञ मौर्य यांना कधीही विसरु शकत नसल्याचे निशांतने म्हटले. तसेच पदवीच्या शिक्षणानंतर परिस्थितीचा सामना करत आणि छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत निशांतने अखेर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश मिळवला. येथूनच हिंदी माध्यमातील विद्यार्थीही युपीएससीचे यश संपादन करु शकतो, हा मुलमंत्र निशांतला मिळाला. त्यानुसार निशांतने हिंदी विषयातील प्राध्यापकांच्या सहवासातून युपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. मात्र, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते, या म्हणीनुसार निशांतच्या वाट्यालाही दोनवेळेस अपयश आले. निशांत दोनवेळा युपीएससी परीक्षेत नापास झाला. त्यावेळी, खचलेल्या निशांतने एक कविताही लिहिली होती. मात्र, दरम्यानच्या काळात निशांतला लोकसभा सचिवालयात भाषांतरकार (अनुवादक) म्हणून नोकरी लागली. त्यामुळे निशांतचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यानंतर निशांतने 2014 साली लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पास केली. तर मुख्य परीक्षेनंतर मुलाखतही दिली होती. 4 जुलै रोजी निशांत आपल्या अलाहाबाद येथील घरी युपी पीसीएस परीक्षेसाठी गेला होता. त्याचवेळी 2014 सालच्या परीक्षेच्या निकालाची वाट निशांत पाहात होता. निशांतच्या कुटुंबीयांनाही निकालाची उत्सुकता होती. अखेर, निशांतसह कुटुंबीयांची प्रतिक्षा संपली. दुपारी 1 वाजता निशांतच्या घरी फोन वाजला. त्यामध्ये निशांतने युपीएससी परीक्षा पास केल्याची बातमी धडकली आणि सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. या परीक्षेत निशांतला 13 वी रँक मिळाली होती. तर हिंदी माध्यमात निशांत पहिला आला होता. कित्येक वर्षानंतर हिंदी माध्यमातून परीक्षा देणारा विद्यार्थी युपीएससी परीक्षेत टॉपर बनला होता.