'हिंदी भाषा देशाला एकजूट करू शकते'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:41 AM2019-09-15T04:41:39+5:302019-09-15T04:41:52+5:30
देशाला आज एकजूट करण्याचे काम जर एखादी भाषा करू शकत असेल तर ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी हीच आहे,
नवी दिल्ली : देशाला आज एकजूट करण्याचे काम जर एखादी भाषा करू शकत असेल तर ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी हीच आहे, असे ट्विट भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त केले. त्यावर दक्षिणेतील राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
अमित शहा यांनी टष्ट्वीट केले की, भारत विविध भाषांचा देश आहे आणि प्रत्येक भाषेचे वेगळे महत्त्व आहे; पण पूर्ण देशाची एक भाषा असणे अत्यंत आवश्यक आहे. जी भाषा जगात भारताची ओळख होऊ शकेल. आज देशाला एकजूट करण्याचे काम हिंदी करू शकते. आज हिंदी दिनानिमित्त मी देशातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपापल्या मातृभाषेचा उपयोग वाढवा आणि हिंदी भाषेचा उपयोग वाढवून पूज्य बापू आणि लोहपुरुष सरदार पटेल यांचे स्वप्न साकार करण्यात योगदान द्या.
हिंदी भाषेत साधेपणा, उत्स्फूर्तता आणि अभिजातता आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी टष्ट्वीट केले की, आज पूर्ण देशात हिंदी दिवस साजरा केला जात आहे. नरेंद्र मोदी कन्नड भाषा दिवस कधी साजरा करणार? ही सुद्धा राज्यघटनेनुसार हिंदीसारखीच अनुसूचित भाषा आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनीही या वादात उडी घेत म्हटले आहे की, हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा खोटारडेपणा बंद करा. कन्नडप्रमाणेच २२ अधिकृत भाषांसारखीच ही भाषा आहे.
>स्टॅलिन म्हणाले, हिंदी लादली जाण्याला आमचा विरोध
डीएमकेचे नेते एम.के. स्टॅलिन यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, हिंदी भाषा लादली जाण्याविरुद्ध आम्ही सतत विरोध करीत आहोत. मात्र, आज अमित शहा यांच्या वक्तव्याने धक्का बसला. देशाच्या एकतेवर यामुळे परिणाम होईल. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी आम्ही करीत आहोत. या मुद्यावर पक्षाच्या बैठकीत उद्या चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.