हिंदी कवी विनोद शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार; छत्तीसगडच्या लेखकाला प्रथमच मिळाला सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 05:47 IST2025-03-23T05:45:30+5:302025-03-23T05:47:58+5:30
याबाबतची घोषणा शनिवारी नवी दिल्लीत करण्यात आली

हिंदी कवी विनोद शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार; छत्तीसगडच्या लेखकाला प्रथमच मिळाला सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: छत्तीसगडचे प्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ल यांना साहित्य जगतातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार यंदा प्रदान केला जाईल. छत्तीसगडमधील लेखकाला हा सन्मान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. याबाबतची घोषणा शनिवारी नवी दिल्लीत करण्यात आली. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘लगभग जय हिंद’ १९७१ मध्ये प्रकाशित झाला आणि तेव्हापासून त्यांच्या लेखनाने साहित्यिक जगात आपले स्थान निर्माण केले आहे. शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी राजनांदगाव येथे झाला. मणि कौल यांनी त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर एक चित्रपटही बनवला होता.
शुक्ल यांचे साहित्य
त्यांचे ‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’ आणि ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबऱ्या हिंदीतील काही सर्वोत्तम कादंबऱ्या मानल्या जातात. तसेच... त्यांचे ‘पेड़ पर कमरा’ आणि ‘महाविद्यालय’ हे कथासंग्रहही खूप चर्चेत राहिले आहेत.
मराठीत कोणाला सन्मान?
- १९७४ - वि. स. खांडेकर
- १९८४ - वि. वा. शिरवाडकर
- २००३ - विंदा करंदीकर
- २०१४ - भालचंद्र नेमाडे
कोणत्या भाषेला किती?
हिंदी - १२, कन्नड - ८, बंगाली - ६, मल्याळम - ६, उर्दू - ५, मराठी - ४, ओरिया - ४, गुजराती -४, तेलुगु - ३, आसामी - ३, तमिळ - २, संस्कृत - २, कोकणी - २, पंजाबी - २, काश्मिरी - १, इंग्रजी -१