हिंदी भाषिक मजुरांचे गुजरातमधून पलायन; साबरकांटा बलात्कार प्रकरणामुळे होणाऱ्या हल्ल्यांचा घेतला धसका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 05:38 AM2018-10-08T05:38:56+5:302018-10-08T05:39:30+5:30
येथील चाणक्यपुरी उड्डाणपुलापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारला जाणा-या खासगी बसेसमधून स्वगृही परतण्यासाठी सध्या अनेक परप्रांतीय मजुरांची गर्दी उसळली आहे.
अहमदाबाद : येथील चाणक्यपुरी उड्डाणपुलापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारला जाणा-या खासगी बसेसमधून स्वगृही परतण्यासाठी सध्या अनेक परप्रांतीय मजुरांची गर्दी उसळली आहे. एका बिहारी मजुराने गेल्या आठवड्यात गुजरातमधील साबरकांटा जिल्ह्यामध्ये १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या गुजरातमधील नागरिकांकडून परप्रांतीय मजुरांवर हल्ले चढविले जात आहेत.
परप्रांतीय मजुरांना गुजरातमधून निघून जाण्याचा सल्ला ते ज्यांच्याकडे काम करतात त्यापैकी काही उद्योजकांनीच दिला आहे. गेल्या काही दिवसांत सुमारे १५०० परप्रांतीय उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथील आपापल्या गावी निघून गेले आहेत. हा प्रवास २५ ते ३० तासांचा असून प्रत्येक बसमध्ये ८० पेक्षा जास्त माणसे कोंबलेली होती.
शनिवारी अहमदाबादहून सुमारे २० बस या तीन राज्यांना रवाना झाल्या.
अन्यथा या राज्यांसाठी अहमदाबादहून दर दोन दिवसांनी एखादी खासगी बस सुटते व त्यात २५ प्रवासीही नसतात.
३४२ जणांना केली अटक
हिंदी भाषिक स्थलांतरित मजुरांवर हल्ले केल्याप्रकरणी आत्तापर्यंत ३४२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ज्या आठ जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत तेथे या लोकांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात आले आहेत, असे गुजरातचे पोलीस महासंचालक शिवानंद झा यांनी सांगितले.
मात्र या स्थलांतरित मजुरांनी भीतीने मोठ्या संख्येने गुजरात सोडून जाण्यास सुरुवात केली आहे, याचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, हे लोक सणासुदीसाठी गावी जात असतील. त्याचा वेगळा अर्थ लावला जाऊ नये.
तरीही या लोकांच्या वस्त्यांमध्ये जाऊन असे कोणी जाताना आढळल्यास त्यांना परावृत्त करण्यास अधिकाºयांना सांगण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.