कोरोनानं दाखवली माणुसकी, हिंदू महिलेवर मुस्लिमांच्या मदतीने झाले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 05:46 AM2020-04-17T05:46:49+5:302020-04-17T05:47:28+5:30
येथील टिला जमालपुरा या जुन्या वसाहतीत एका हिंदू महिलेचा (५०) सरकारी रुग्णालयात यकृताच्या आजारावर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे मृत्यू झाला
भोपाळ : कोरोना विषाणूला (कोविड-१९) रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भोपाळ शहरात धार्मिक सद््भाव, प्रेम व संकटप्रसंगी मदतीचा हात पुढे करण्यासाठी जात-धर्म अशा कशाचाही अडथळा येत नाही, हेच दिसले.
येथील टिला जमालपुरा या जुन्या वसाहतीत एका हिंदू महिलेचा (५०) सरकारी रुग्णालयात यकृताच्या आजारावर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे तिचे नातेवाईक अंत्यसंस्काराला येऊ शकत नव्हते. त्यामुळे आम्ही तिचा मृतदेह छोला विशराघाट स्मशानभूमीत नेला, असे शाहिद खान यांनी सांगितले. खान यांनीच अंत्यसंस्काराची सगळी तयारी केली. महिलेचा पती मोहन नामदेव हा किरकोळ वस्तू विक्रेता असून त्यांना दोन मुले आहेत. हे कुटुंब गरीब असून महिला बऱ्याच दिवसांपासून आजारी होती, असे खान म्हणाले. लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोकच उपस्थित राहू शकतात हे आम्हाला माहीत होते, असे खान म्हणाले. या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. त्यात मुस्लिम लोक मास्क लावून व स्कल कॅप्स घालून मृतदेह स्वत:च्या खांद्यावर स्मशानभूमीत नेताना दिसतात. याच महिन्यात इंदूरमध्ये मुस्लिमांनी असाच पुढाकार घेतला होता. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुस्लिम समाजाची या मदतीबद्दल प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)