तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी; हिंदू महासभेने दिली कमल हसन यांना हत्येची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 08:29 AM2019-05-14T08:29:31+5:302019-05-14T08:32:36+5:30
नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे.
मेरठ - नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता या अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण पेटले आहे. नथुराम गोडसेहिंदू दहशतवादी होता यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कमल हसन यांना हिंदू संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी सोमवारी मेरठमध्ये नथुराम गोडसे यांना दहशतवादी बोलणारे मुर्ख आणि हिंदुच्या नावावर कलंक आहेत अशी टीका केली.
यावेळी बोलताना अभिषेक अग्रवाल म्हणाले की, नथुराम गोडसेंच्या नावावर कमल हसन यांच्याकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. दहशतवादी कृत्यांना समर्थन देणारे कमल हसन, फारुख अब्दुला, नवज्योत सिंग सिद्धू आणि मेहबुबा मुफ्तीसारखे लोक आहे. जे दहशतवाद्यांचे रक्षण करतात असं त्यांनी सांगितले.
तसेच सवंग लोकप्रियतेसाठी नथुराम गोडसे यांचे नाव दहशतवादासोबत जोडण्याचे काम केले त्यामुळे हसन यांच्या हत्येसाठी ते स्वत:च जबाबदार असतील. नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे. त्याचसोबत एआयडीएमकेकडून कमल हसन यांच्या विधानाचा निषेध करत कमल हसन यांची जीभ छाटली पाहिजे असं विधान तामिळनाडुतील मंत्री टी. राजेंद्र यांनी सोमवारी केलं.
स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादीहिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं होतं. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलं. अर्वाकुरची येथील प्रचारसभेत ते बोलत होते. त्यांच्या या विधानावरुन राजकारण पेटलं आहे. त्यावेळी बोलताना कमल हसन म्हणाले होते की, पहिला हिंदू दहशतवादी नथुराम गोडसे होता. या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे मी हे बोलत नाही तर माझ्यासमोर महात्मा गांधी यांचा पुतळा आहे त्याच्यासमोर उभं राहून मी हे सांगतोय.