एकाच वेळी एकाच मांडवात पार पडला हिंदू-मुस्लीम जोडप्याचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 02:22 PM2018-02-20T14:22:30+5:302018-02-20T14:23:10+5:30
एका हिंदू व मुस्लीम जोडप्याचा विवाह सोहळा एकाच वेळी एकाच मांडवात पार पडला.
रोहतक- रोहतकमध्ये सामाजिक सलोख्याचं दर्शन घडलं आहे. एका हिंदू व मुस्लीम जोडप्याचा विवाह सोहळा एकाच वेळी एकाच मांडवात पार पडला. आपापल्या परंपरेची व सांस्कृतिक मुल्यांचं पालन करत हे दोन विविध जातीचे विवाह एकाच मांडवात पार पडले. रविवारी दुपारील जिंदमधील बॅन्क्वेट हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
जिंदमध्ये राहणारे राजेंद्र कुमार व शब्बीर खान हे गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांचे शेजारी आहेत. राजेंद्र व शब्बीर यांच्या शालू आणि शबनम या दोन मुलींच्या विवाहासाठी त्यांनी रोहतक रोडजवळ असणारा बॅन्क्वेट हॉल बूक केला होता. राजेद्र यांनी 18 फेब्रुवारी संध्याकाळसाठी हॉलचं बुकिंग केलं होतं तर शब्बीर यांचं त्याच दिवशीचं दुपारचं बुकिंग होतं.
पण शालूच्या लग्नासाठी दुपारी हॉलचं बुकिंग केल्याचा गैरसमज राजेंद्र यांना झाला. हेच डोक्यात ठेवून त्यांनी कॅटरिंग व इतर गोष्टी दुपारसाठी बूक केल्या. पण दुपारची वेळ दुसऱ्या एका लग्नासाठी दिली असल्याचं हॉलच्या मालकाने रविवारी राजेंद्र यांना सांगितलं. हॉल मालकाची माहिती ऐकुन राजेंद्र यांना धक्का बसला. सगळ्या पाहुण्यांना दुपारची लग्नाची वेळ सांगण्यात आली होती. त्यामुळे पुढे काय करणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होता. राजेंद्र यांच्या चिंतेवर शब्बीर यांनी एका मिनिटात तोडगा सांगितला. दोन्ही मुलींची लग्न एकाच मांडवात करू, असं शब्बीर यांनी राजेंद्र यांना सांगितलं.
शब्बीर यांनी सुचविलेला पर्याय सगळ्यांसाठी अचानक होता. पण सगळ्या नातेवाईकांनी त्याला प्रोस्ताहन दिलं. सोनपट व फरिदाबादहून येणाऱ्या दोन्ही नवरदेवांच्या कुटुंबीयांनीही काही हरकत घेतली नाही. लग्न मांडवात दोन कॅटरर्स असल्याने दोन वेगवेगळ्या प्रकारचं जेवण तयार केलं होतं. पण लग्न लागल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमात मजा केली, असं शब्बीर यांनी सांगितलं.
लग्न व निकाह एकाच ठिकाणी झाल्याचं पहिल्यांदा पाहिलं. एकमेकांपासून 50 फूट अंतरावर हे दोन्ही सोहळे आनंदात पार पडले, असं राजेंद्र यांनी सांगितलं.