JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:29 AM2020-01-07T09:29:26+5:302020-01-07T09:56:32+5:30
'देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल'
गाझियाबाद: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी संध्याकाळी माक्सधारी तरुणांनी हिंसाचार घडवला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंदू रक्षा दलानं या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र कुमार तोमर उर्फ पिंकी चौधरींनी सोमवारी रात्री याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
भूपेंद्र कुमार तोमर यांनी व्हायरल केलेला व्हिडीओ १ मिनिट ५८ सेकंदांचा आहे. हिंदू रक्षा दल देशविरोधी कारवाया सहन करणार नाही, असा थेट इशारा त्यांनी व्हिडीओतून दिला आहे. 'देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना रविवारी संध्याकाळी ज्या पद्धतीनं उत्तर देण्यात येईल, तशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल. आमच्याच कार्यकर्त्यांनी जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केली. धर्माच्या विरोधातील विधानं आम्ही सहन करणार नाही,' असं तोमर म्हणाले.
जेएनयू कम्युनिस्टांचा अड्डा असून या ठिकाणी देशविरोधी कारवाया होतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. 'आम्ही धर्मासाठी आमच्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहोत. यापुढेही कोणी देशविरोधी कृत्यं करण्याचा प्रयत्न केला, तर याच पद्धतीनं प्रत्युत्तर मिळेल,' असा इशारा त्यांनी दिला. दिल्लीतील आम आदमी पार्टीवर हल्ला केल्या प्रकरणी तोमर यांना तुरुंगवास घडला होता. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यातही त्यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.