हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:22 AM2020-01-08T06:22:23+5:302020-01-08T06:23:55+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी नेत्यांना झालेल्या मारहाणीची जबाबदारी हिंदू रक्षक दलानी उघडपणे स्वीकारली असली तरी पोलिसांनी मात्र त्या विद्यार्थी नेत्यांवरच गुन्हे नोंदविले आहेत.
नवी दिल्ली : गेल्या रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी नेत्यांना झालेल्या मारहाणीची जबाबदारी हिंदू रक्षक दलानी उघडपणे स्वीकारली असली तरी पोलिसांनी मात्र त्या विद्यार्थी नेत्यांवरच गुन्हे नोंदविले आहेत. त्यामुळे जेएनयूसह सर्वच विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार गुन्हेगारांवर कारवाई न करता विद्यार्थी नेत्यांनाच त्रास देत आहे, असा आरोप काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केला आहे.
गाझियाबादमध्ये राहणारा हिंदू रक्षा दलाचा प्रमुख पिंकी चौधरी याने आमच्या कार्यकर्त्यांनीच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर हल्ले केले, असा दावा एका व्हिडीओद्वारे केला. जेएनयूमध्ये कम्युनिस्टांचे म्हणजेच देशविरोधी मंडळींचे प्राबल्य आहे. अशा शक्तींना देशात जागा नाही.
आम्ही त्यांना तिथे राहू देणार नाही, अशी धमकीही पिंकी चौधरी याने दिली. इतक्या उघडपणे हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाºया चौधरीला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही वा त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंदविला नाही. आम्ही त्या व्हिडीओची चौकशी करीत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
चौधरी याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी जेएनयूमधील जखमी विद्यार्थ्यांवरच गुन्हे नोंदवायला सुरुवात केली. विद्यापीठ छात्र संघाच्या अध्यक्ष आयशे घोष यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठातील शांतता भंग करण्याचा व सर्व्हर रुम फोडल्याचा आरोप त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. या हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळपासून या हल्ल्याची तपासणी सुरू केली. ही तपासणी सुरू असताना पोलिसांनी विद्यार्थी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विद्यापीठाच्या आावारातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.चेहरा ओळखणाºया तंत्रज्ञानाचाही वापर पोलिस करीत आहेत. बुरखा घालून हल्लेखोरांचे जे टोळके आले होते, ते कोण आहेत, हे आम्ही शोधू असे पोलिसांनी सांगितले आहे.
हल्ल्यातील जखमी प्राध्यापक सुचित्रा सेन यांनीही आज पोलिसांत तक्रार केली आहे. सेन यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. विद्यापीठाच्या बाहेरील युवक विद्यापीठाच्या आवारात काठ्या, सळई आणि अन्य हत्यारे घेऊन आले होते. प्रथम मला एक दगड माझ्या खांद्याला लागला आणि त्यानंतरचा दगड माझ्या डोक्याला लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे सेन म्हणाल्या.
>मोदींचे मौन का?
एवढी हिंसा होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का आहे? त्यांची मन की बात कुठे गेली? असा संतप्त सवाल माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी विचारला. मोदींचे मौनच सारे काही बोलत असल्याची टीका त्यांनी केली आहे. हा हल्ला रानटी स्वरूपाचा असल्याची टीका नॉर्थ ईस्ट स्टुडंटस असोसिएशनने केली. या प्रकारातील दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
>कुलगुरूंचे आवाहन
विद्यापीठात जे झाले ते विसरून विद्यार्थ्यांनी विद्यापीठात परत यावे, असे आवाहन कुलगुरू एम. जगदेश कुमार यांनी केले आहे. जखमी विद्यार्थ्यांविषयी मला सहानुभूती आहे. असे ते म्हणाले.