हिंदू समाज म्हणजे भाजपा नव्हे, भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही- भैय्याजी जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:47 AM2020-02-10T10:47:49+5:302020-02-10T10:50:44+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चे नेते भैय्याजी जोशी यांनी रविवारी भाजपा आणि हिंदुत्वासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चे नेते भैय्याजी जोशी यांनी रविवारी भाजपा आणि हिंदुत्वासंदर्भात मोठं विधान केलं आहे. भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध केला हे समीकरण योग्य नाही. जोशी यांनी गोव्यात 'विश्वगुरू भारता'वर भाषण देत असताना एका प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केलं आहे. हिंदू आपल्याच समाजाचे शत्रू का होत आहेत, असं विचारले असता भैय्याजी जोशी म्हणाले, आम्ही भाजपाला केलेला विरोध हा हिंदूंना केलेला विरोध समजत नाही. ही एक राजकीय लढाई असून, ती सुरूच राहणार आहे. याला हिंदूंशी जोडणं योग्य नाही.
हिंदू हा हिंदू समाजाचा शत्रू होत आहे, म्हणजेच भाजपाचा शत्रू होत आहे. हिंदू समुदायाचा अर्थ भाजपा नाही. विशेष म्हणजे भैय्याजी जोशींचं हे विधान नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी)ला विरोध होत असताना आल्यानं त्याल महत्त्व प्राप्त झालं आहे. एक हिंदू आपल्या हिंदू भावाविरोधात लढतो कारण तो त्यावेळी धर्म विसरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपल्या कुटुंबीयांचा विरोध सहन करावा लागला होता. जिथे गोंधळ आणि आत्मकेंद्रीपणाचा व्यवहार असतो, तिकडे विरोध हा होतच असतो. लोकांच्या अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा फायदा उठवून ख्रिस्ती धर्मात रूपांतर करण्याचा आरोपही भैय्याजी जोशींनी केला आहे. जर कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारणार असेल तर आम्हाला आक्षेप नाही. परंतु जबरदस्तीनं धर्मांतर करणं हा गुन्हा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.