"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:01 PM2024-09-21T12:01:46+5:302024-09-21T12:03:28+5:30

Tirupati Laddu Prasadam Controversy : आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

hindu society should get control of temples vhp demands amid tirupati laddu prasadam controversy | "मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

Tirupati Laddu Prasadam Controversy : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापलं आहे. या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) शुक्रवारी (२० सप्टेंबर) मोठी मागणी केली आहे. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर असहनीय असल्याचे विहिंपने म्हटले आहे. आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री बजरंग बागरा यांनीही देशभरातील हिंदूंची सर्व मंदिरे आणि अन्य देवस्थान सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली. तसेच, तिरुपती मंदिराच्या प्रसादला अपवित्र करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. "तिरुपतीच्या घटनेने विश्व हिंदू परिषदेचा विश्वास अधिक दृढ होतो की, मंदिरांवर सरकारी नियंत्रणामुळे राजकीय प्रवेश होतो. तेथे (सरकारी-नियंत्रित मंदिरांमध्ये) गैर-हिंदू अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे प्रसाद मुद्दाम अशाप्रकारे अपवित्र केला जातो", असा आरोप बजरंग बागरा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.

हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे सरकारी नियंत्रणाखाली राहू नयेत, अशी विहिंपची अनेक दिवसांपासून मागणी आहे. तिरुपती लाडू प्रसादामधील प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर हे असहनीय आणि घृणास्पद कृत्य आहे. यामुळे संपूर्ण हिंदू समाज व्यथित आणि दुखावला आहे. हिंदू समाज आपल्या श्रद्धेवर असे वारंवार होणारे हल्ले सहन करणार नाही, असे बजरंग बागरा म्हणाले. तसेच, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यावर गांभीर्याने विचार करतील, असा आम्हाला विश्वास आहे. तिरुपती लाडू प्रकारणाचा निःपक्षपातीपणे तपास करून त्यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. 

विनोद बन्सल यांनीही केलं मोठं विधान 
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनीही तिरुपती मंदिर आणि देशभरातील इतर सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "फक्त तिरुपती मंदिरावर सरकारचे नियंत्रण नाही. तर देशभरातील राज्यांमध्ये चार लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकारने मंदिरे आणि त्यांची मालमत्ता हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावी. मंदिरांचे खरे विश्वस्त हिंदू आहेत, सरकार नाही. हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांवर सरकारी नियंत्रणाविरोधात विहिंप लवकरच मोठी मोहीम सुरू करणार आहे."

Web Title: hindu society should get control of temples vhp demands amid tirupati laddu prasadam controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.